त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अगदी परफेक्ट स्किनकेअर रुटीन, महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स, घरगुती पारंपरिक उपाय असं सगळं वेळच्यावेळी करून देखील अनेकदा त्वचेवर पिंपल्स येतात किंवा अनेक समस्या उद्भवतात. वेळच्यावेळी योग्य प्रकारे त्वचेची काळजी घेऊन देखील जर त्वचेवर पिंपल्स किंवा त्वचेसंबंधित वारंवार समस्या वाढतच असतील तर त्याचे कारण आहे तुमची बेडशीट. रोजच्या वापरातील घाणेरडी, मळकी बेडशीट किंवा चादर यामुळे देखील त्वचेच्या समस्या सतत त्रास देतात(Is your dirty bedsheet causing pimples).
रात्रीची शांत झोप घेताना आपण अनेक तास बेडशीट व चादरीच्या संपर्कात असतो. अंगावर घ्यायच्या बेडशीटमध्ये किंवा ब्लँकेटमध्ये धूळ, घाम, तेल आणि बॅक्टेरिया जमा झालेले असतात. जेव्हा आपली त्वचा या घाणेरड्या बेडशीट तसेच चादरीच्या संपर्कात येते, तेव्हा हे बॅक्टेरिया त्वचेच्या छिद्रांमध्ये प्रवेश करतात आणि तिथे संसर्ग निर्माण करतात. यामुळे त्वचेवर लालसरपणा, पुरळ आणि मुख्य म्हणजे पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढते. रोजच्या वापरातील चादर किंवा बेडशीटमुळे त्वचेचे आरोग्य कसे बिघडते किंवा त्यांचा (dirty bedding skin problems) नेमका काय संबंध असतो ते पाहूयात...
घाणेरड्या बेडशीटमुळे त्वचेवर पिंपल्स का येतात?
रात्री झोपताना आपल्या त्वचेतील तेल, घाम, डेड स्किन आणि त्वचेवर लावलेली क्रीम किंवा मेकअप बेडशीट तसेच चादरीमध्ये शोषले जातात. या सगळ्या गोष्टी बॅक्टेरिया आणि बुरशीसाठी उत्तम खाद्य बनतात. जर बेडशीट वारंवार धुतली गेली नाही, तर त्यात बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात. जेव्हा अशा बेडशीट किंवा चादरीच्या संपर्कात त्वचा येते, तेव्हा हे जीवाणू त्वचेच्या छिद्रांमध्ये जातात आणि तिथे इंफेक्शन करतात, ज्यामुळे पिंपल्स आणि ॲक्ने तयार होतात.
घाणेरड्या बेडशीटमुळे अनेकदा फंगल ॲक्ने (Fungal Acne) किंवा फॉलिक्युलायटिस (Folliculitis) अशा त्वचेसंबंधित समस्या त्रास देऊ शकतात. यात त्वचेला बुरशीचा संसर्ग होतो आणि लहान, लालसर पुरळ येतात.
बेडशीट धुण्यासाठी वापरलेल्या डिटर्जंटचे कण व्यवस्थित धुतले न गेल्यास ते बेडशीट किंवा चादरीमध्ये तसेच राहतात. हे कण त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेची जळजळ होते. काही चादरी किंवा बेडशीट्स खडबडीत असतात. त्यांच्यामुळे त्वचेवर सतत घर्षण होते, ज्यामुळे त्वचेवरील पोर्सना त्रास होतो आणि पिंपल्स, ॲक्नेची समस्या वाढते.
बेडशीटमुळे होणारे पिंपल्स टाळण्यासाठी उपाय...
१. अंगावर घ्यायची बेडशीट आणि उशीचे कव्हर किमान आठवड्यातून एकदा तरी बदला. जर तुम्हाला जास्त घाम येत असेल किंवा तेलकट त्वचा असेल, तर दर चार दिवसांनी ते बदलावे.
२. बेडशीट धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. गरम पाण्यामुळे जीवाणू आणि बुरशी झटपट नष्ट होतात.
३. शक्यतो कॉटन किंवा सिल्क फॅब्रिकच्या बेडशीट आणि उशीचे कव्हर वापरा. हे फॅब्रिक्स कमी उष्णता निर्माण करतात.
४. मेकअप न काढता झोपू नका. झोपण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा.
५. घाम आलेला असल्यास किंवा दिवसभर बाहेरून आल्यानंतर अंथरूणावर जाण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ करावी.
तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी जर तुमची बेडशीट किंवा चादर अस्वच्छ असेल, तर तुमचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरू शकतात.