Join us

तांदळाचं पाणी त्वचेसाठी फार मोलाचं, नॅचरल टोनर करेल केसही मजबूत आणि चमकदार! पाहा कसं वापरायचं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:28 IST

Rice Water For Skin : तांदळाच्या पाण्यानं त्वचा साफ होते, हायड्रेट राहते आणि चमकदारही होते. कारण यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अमीनो अ‍ॅसिड आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतं.

Rice Water Benefits For Skin And Hair: तांदळाचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भात तर लोक रोजच खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तांदळाचा वापर तुम्ही त्वचा चमकदार करण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी करू शकता. फार पूर्वीपासून तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. तांदळाच्या पाण्यानं त्वचा साफ होते, हायड्रेट राहते आणि चमकदारही होते. कारण यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अमीनो अ‍ॅसिड आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतं. हे तत्व त्वचेची जळजळ कमी करतात व केस मजबूत करतात.

तांदळाच्या पाण्याची खासियत म्हणजे हा एक नॅचरल उपाय आहे. इतर केमिकल प्रोडक्ट्ससारखे याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळे तांदळाच्या पाण्याचा वापर तुम्ही त्वचेसाठी आणि केसांसाठी बिनधास्त करू शकता. सोबतच यासाठी तुम्हाला जास्त खर्चही लागत नाही. महत्वाची बाब म्हणजे हे पाणी उन्हाळ्यात त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं. 

नॅचरल टोनर

तांदळाचं पाणी एक इफेक्टिव टोनरसारखं काम करतं. त्वचेची रोमछिद्रे मोकळं करतं आणि त्वचा टाइट करतं. तांदळाचं पाणी कापसाच्या मदतीनं चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते. त्याशिवाय सनर्बन कमी करण्यास, सूज कमी करण्यास आणि रेडनेस कमी करण्यासही तांदळाचं पाणी मदत करतं.

ज्या लोकांना डार्क सर्कल आणि पफीनेसची समस्या आहे, त्यांच्यासाठी तांदळाचं थंड पाणी एक चांगला पर्याय आहे. तांदळाच्या थंड पाण्यात कॉटन बुडवून तो काही मिनिटांसाठी डोळ्यांखाली ठेवा. डार्क सर्कल कमी होईल आणि तुम्हाला आरामही मिळेल.

मजबूत आणि चमकदार केस

त्वचेसोबतच तांदळाचं पाणी केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं. शाम्पू केल्यानंतर तांदळाच्या पाण्यानं केस धुतल्यास केस मुलायम, चमकदार होतील. तसेच या पाण्यानं डोक्याच्या त्वचेला पोषणही मिळतं. केसगळती, केस तुटणे अशा समस्याही दूर होतात.

तांदळाचं पाणी कसं बनवाल?

१) तांदूळ चांगले धुवून घ्या, हे काही तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून एखाद्या बॉटलमध्ये स्टोर करा.

२) तांदळाच्या वापराची दुसरी पद्धत म्हणजे तांदूळ अधिक पाण्यात शिजवा. पाणी गाळून घ्या आणि वापरण्यासाठी थंड होऊ द्या.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स