Lemon For Hair Care : केस अनेकदा तर इतके कमजोर होतात की, मधून तुटूही लागतात, गळतात, पांढरे होतात. हिवाळ्यात तर वातावरण बदलामुळे केसांच्या अनेक समस्या होतात. योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश न मिळाल्याने केसात आरोग्य बिघडतं. जर तुम्हालाही ही समस्या होत असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला एक सोपा घरगुती उपाय सांगत आहोत. तो उपाय म्हणजे लिंबू.
लिंबातील खास गुण फायदेशीर
लिंबू हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. संक्रमणापासून बचाव करण्यासोबतच याने शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यास मदत मिळते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी देखील डॉक्टर लिंबू पाणी सेवन करण्याचा सल्ला देतात. आरोग्यासोबतच लिंबू केसांसाठीही फायदेशीर ठरतं.
केसांसाठी कसं फायदेशीर?
लिंबाच्या रसात भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी असतात. याने डोक्यातली कोलेजनची निर्मिती वाढवून केसांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. तेच यातील अॅसिडमुळे डोक्याच्या त्वचेची चांगली स्वच्छताही होते आणि केसही मजबूत होतात. लिंबात सायट्रिक अॅसिड, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आमि फ्लानोएड तत्वही असतात. हे तत्व केसांची चांगली वाढ करतात. लिंबाचा रस तुम्ही केसांवर आणि केसांच्या मुळात लावू शकता. सोबतच इतर वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही लिंबाचा रस केसात लावू शकता.
ऑयली केसांसाठी
जर तुमचे केस ऑयली असतील तर लिंबाचा रस केसांच्या मुळांना लावा. यासाठी लिंबाचा रस एका वाटीत काढा आणि कापसाच्या मदतीने केसांच्या मुळात चांगल्याप्रकारे लावा. दोन मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा. १० मिनिटांनी केस शाम्पूने धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.
ड्राय केसांसाठी
ड्राय केसांसाठी वेगळ्या पद्धतीने लिंबाचा वापर करावा लागतो. ड्राय केस हे लवकर गळतात, त्यामुळे त्यांची काळजी घेताना काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. यासाठी अर्ध्या लिंबाच्या रसात १ मोठा चमचा खोबऱ्याचं तेल किंवा अॅलोव्हेरा जेल मिश्रित करा. हे केसांना लावा आणि १० मिनिटांने केस स्वच्छ करा. तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही मधही मिश्रित करू शकता.
