Skin Care Tips : अनेकदा चेहऱ्यावर काही पुरळ किंवा फोड असे येतात ज्यात पस जमा झालेला असतो. या फोडोंमध्ये वेदनाही खूप होतात. हे फोड फोडले तर पस चेहऱ्यावर पसरतो आणि मग सगळीकडे तसेच फोड होतात. या फोडांचे डागही चेहऱ्यावर पडतात. अशात त्वचेची योग्य ती काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं.
त्वचेची काळजी घेणं काही अवघड काम नसतं. फक्त आपल्याला योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. अशात पस असलेले फोड किंवा पुरळ कशा दूर करायच्या यासाठी आपण आज ३ उपाय बघणार आहोत.
कच्चं दूध
चेहऱ्यावरील हे फोड दूर करण्यासाठी महागड्या किंवा केमिकल असलेल्या प्रॉडक्ट्सचा वापर करणं गरजेचं नाही. काही घरगुती उपाय करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. यासाठी सगळ्यात आधी गुलाबजलनं त्वचा साफ करा आणि नंतर १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर कच्चं दूध लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्यानं धुवा. या उपायानं चेहऱ्यावरील फोडांची समस्या दूर होईल.
कडूलिंबाचं तेल
कडूलिंबाच्या पानांसारखंच कडूलिंबाचं तेल सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. हे तेल आपण इतर कोणत्या तेलासोबत किंवा थेट असंच चेहऱ्यावर लावू शकता. या तेलात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-सेप्टिक गुण असतात. या गुणांमुळे चेहऱ्यावरील फोड, पुरळ दूर होण्यास मदत मिळते.
तूप लावा
अनेक स्किन एक्सपर्ट सांगतात की, रात्री झोपण्याआधी जर फोडांवर तूप लावलं तर त्यांची सूज कमी होते. जर २ ते ३ दिवस हा उपाय कराल तर फोडातील पस निघेल आणि दुखणंही कमी होईल.