Homemade Toner: हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेची काळजी घेणं खूपच आवश्यक असतं. थंड वाऱ्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो आणि कोरडेपणा वाढू लागतो. यापासून बचावासाठी अनेकजण बाजारात मिळणारे टोनर वापरतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहते खरी, पण त्याचा प्रभाव जास्त वेळ राहत नाही. तसेच केमिकलयुक्त टोनरमुळे कधी-कधी साइड इफेक्ट्सही दिसू शकतात. म्हणूनच आज आपण अशा काही नैसर्गिक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी टोनर तयार करू शकता. यामुळे फायदा उत्तम मिळेल आणि खिशावरही भार पडणार नाही.
ग्रीन टीपासून टोनर
ग्रीन टी आजकाल बहुतेक घरांमध्ये सहज उपलब्ध असते. तिच्या मदतीने तुम्ही घरगुती टोनर तयार करू शकता. त्यासाठी ग्रीन टी पाण्यात चांगली उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर ते स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे पाणी चेहऱ्यावर स्प्रे करा. याने त्वचेला ताजेपणा जाणवतो आणि पोअर्स टाइट होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला चमकदार आणि हायड्रेट ठेवतात.
अॅलोवेरा टोनर
त्वचेसाठी अॅलोवेरा म्हणजे वरदानच मानलं जातं. यात असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेच्या समस्या दूर करण्यात मदत करतात. टोनर बनवण्यासाठी 2 चमचे अॅलोवेरा जेलमध्ये अर्धा कप पाणी मिसळा आणि नीट मिक्स करून घ्या. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. तुमचा अॅलोवेरा टोनर तयार आहे. याचा वापर केल्याने त्वचा हायड्रेट, मुलायम आणि तेजस्वी होते.
गुलाबपाणी आणि काकडीचा टोनर
घरच्या घरी गुलाबपाणी आणि काकडीचा टोनरही तयार करता येतो. काकडी किसून त्याचा रस काढा. त्यात तेवढ्याच प्रमाणात गुलाबपाणी मिसळा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. हा टोनर लावल्याने चेहरा मॉइश्चराइज होतो आणि कोरडेपणा दूर होतो.
लिंबाचा टोनर
लिंबाचा टोनर बनवण्यासाठी 1 ग्लास पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. याचा वापर केल्याने चेहऱ्याची खोलवर स्वच्छता होते आणि त्वचा चमकदार दिसू लागते.
