Homemade sugandhi Utane : दिवाळी म्हटली की रोषणाई, सजावट आणि फराळासोबत उटणे लावण्याचं विशेष महत्त्व असतं. पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. आधी जास्तीत जास्त लोक हे उटणे घरीच तयार करत असत. मात्र आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उटणे मिळतात. काहींमध्ये घातक केमिकल्स असतात. त्यामुळे आज आपण पाहूया, घरच्या घरी नैसर्गिक आणि सुगंधी उटणे कसं तयार करायचं.
उटणं म्हणजे काय?
उटणं हा अगरू (एक सुगंधी झाड), चंदन, कस्तुरी, केशर यांसारख्या सुगंधी आणि औषधी पदार्थांपासून बनवलेला लेप असतो. हे अंगाला लावल्याने शरीर स्वच्छ होतं, त्वचा उजळते आणि शरीराला मंद सुगंध येतो.
आजकाल उटणे बनवताना कापूरकाचऱ्या, बावची, गुलाबाच्या पाकळ्या, वाळ्याची मुळे, हळद, अर्जुन वृक्षाची साल इत्यादी घटक वापरले जातात. हे उटणं दूधात भिजवून त्यात थोडं तिळाचं तेल घालतात आणि मग अंगाला लावतात. वाळण्यापूर्वी हलक्या हाताने घासून काढल्यास त्वचा मऊ आणि स्वच्छ होते.
उटणं लावण्याचे फायदे
त्वचा कोरडी पडत नाही
उटणात असलेली आंबेहळद आणि तिळाचं तेल त्वचा मऊ ठेवतात आणि नैसर्गिक ओलावा टिकवतात.
त्वचा उजळते
मसूर डाळ त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि चेहऱ्याची कांती उजळवते.
अंगावरील केस दूर होतात
उटणं घासून काढल्याने अंगावरील हलके केस निघतात आणि त्वचा गुळगुळीत होते.
सुगंध आणि ताजेपणा
वाळा, कापूर आणि गुलाबाचे घटक अंगास मंद सुगंध देतात, ज्यामुळे शरीर आणि मन ताजेतवाने राहते.
घरच्या घरी उटणं तयार करण्याची पद्धत
मसूर डाळ पीठ 110 ग्रॅम
आवळकाठी 10 ग्रॅम
सरीवा 10 ग्रॅम
वाळा 10 ग्रॅम
नागरमोथा 10 ग्रॅम
जेष्ठमध 10 ग्रॅम
सुगंधी कचोरा 10 ग्रॅम
आंबेहळद 2 ग्रॅम
तुलसी पावडर 10 ग्रॅम
मंजीष्टा 10 ग्रॅम
कापूर 2 ग्रॅम
सर्व घटक मिक्सरमध्ये बारीक करून एअर टाईट डब्यात साठवा. उटणं वापरताना दुधात किंवा गुलाबपाण्यात भिजवून थोडं तिळाचं तेल घालून अंगाला लावा. चेहऱ्यावर उटणं खूप घासू नका, हलक्या हाताने लावा. लहान मुलांसाठी उटणात हळद, बेसन आणि दूध वापरल्यास अधिक सौम्य आणि सुरक्षित राहतं.