Join us

उन्हाळ्यात टॅनिंगमुळे काळपट दिसू लागली त्वचा? 'या' घरगुती उपायांनी त्वचा पुन्हा उजळेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:38 IST

Tanning Home Remedies : आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही टॅनिंगची समस्या दूर करू शकता. 

Tanning Home Remedies : उन्हाळा सुरू होताच त्वचेसंबंधी वेगवेगळ्य समस्या होणं सुरू होतात. यातील सगळ्यात जास्त होणारी समस्या म्हणजे टॅनिंग म्हणजेच त्वचेवर काळपटपणा येणं. टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीनचा वापरही केला जातो, पण काही फायदा मिळत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही टॅनिंगची समस्या दूर करू शकता. 

हळद आणि बेसन

हळद आणि बेसनाच्या पॅकमध्ये स्क्रबिंग इफेक्ट्स असतात. ज्यामुळे त्वचा चमकते आणि टॅनिंग दूर होण्यास मदत मिळते. बेसन त्वचा साफ करण्यास आणि मृत पेशींना दूर करण्यास मदत करते. त्यामुळे हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.

कसा कराल वापर?

दोन चमचे बेसनामध्ये चिमुटभर हळद, एक चमचा दूध आणि एक चमचा संत्र्याच्या सालीचं पावडर टाकून त्यात थोडं गुलाबजल मिक्स करा. हे मिश्रण त्वचेवर 20 मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर साध्या पाण्यानं धुवून घ्या. टॅनिंग दूर करण्यासाठी हा फेसपॅक खूप फायदेशीर ठरतो.

कोरफड आणि टोमॅटो

कोरफड आणि टोमॅटोचा फेसपॅकही टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यात तुम्ही मसूरची डाळही टाकू शकता. ज्यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते आणि त्वचेवरील टॅनिंग दूर होते. कोरफडीनं त्वचेवरील जळजळ आणि खाज दूर होते. तर टोमॅटोनं डॅमेज झालेली त्वचा रिपेअर होते.

कसा कराल वापर?

एक चमचा मसूरची डाळ 20 मिनिटांसाठी भिजवून ठेवा. त्यानंतर त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये आणि 1 चमचा टोमॅटोच्या गरामध्ये मिक्स करा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 20 मिनिटांसाठी तशीच ठेवा. नंतर त्वचा धुवून घ्या.

दही आणि संत्री

दही आणि संत्र्याच्या मिश्रणात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी मुळे त्वचेमधील पेशी पुन्हा नवीन तयार होतात. संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्यानं त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचा आतून साफ होते. तर दही नॅचरल ब्लीचिंगचं काम करतं. 

कसा कराल वापर?

1-1 चमचा दही आणि संत्र्याचा रस मिक्स करा. हे मिश्रण 30 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. यानं टॅनिंग दूर होण्यास मदत मिळेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स