Facelift Surgery : आजच्या जगात सगळ्याच तरूण-तरूणींना आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. असं केल्यास आत्मविश्वास तर वाढतोच, आणि सोशल मीडियावर आपल्याला एक वेगळ ओळखही मिळते. म्हणूनच आता अलिकडे फेसलिफ्टसारख्या सर्जरींचा ट्रेंड, जो आधी ४० ते ६० वयोगटातील महिलांमध्ये लोकप्रिय होता, आता २० ते ३० वयोगटातही वेगाने वाढत आहे.
तरुण महिलांमध्ये फेसलिफ्टचा वाढता ट्रेंड
३० वर्षांच्या आसपासच्या अनेक महिला आता मिनी फेसलिफ्ट, नेक लिफ्ट आणि लिप लिफ्ट अशा सर्जरी करत आहेत आणि त्यासाठी लाखो रुपये खर्च करायलाही तयार आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावर 'तरुण आणि परफेक्ट' दिसण्याचा दबाव.
काय आहे फेसलिफ्ट?
फेसलिफ्ट प्रक्रियेत चेहऱ्याच्या स्नायूंना आणि त्वचेखालील टिश्यूंना वर ओढून चेहऱ्याचा सैलपणा कमी केला जातो. नवीन तंत्रज्ञान ‘डीप प्लेन फेसलिफ्ट’ त्वचेच्या आतील थरांवर काम करतं, ज्यामुळे परिणाम अधिक नैसर्गिक आणि टिकाऊ दिसतो. पूर्वी ही सर्जरी वय लपवण्यासाठी केली जात होती, पण आता ती 'ब्युटिफिकेशन' म्हणजेच सौंदर्य वाढवण्याचं साधन बनली आहे.
सोशल मीडियाचा प्रभाव
ब्रिटनमध्ये गेल्या वर्षभरात फेसलिफ्ट सर्जरीच्या केसेसमध्ये ८% वाढ झाली आहे, तर अमेरिकेत ३५ ते ५५ वयोगटातील महिलांमध्ये ही वाढ ३२% इतकी आहे. एका संशोधनानुसार, ५७% महिलांना सोशल मीडियावरील फिल्टर केलेल्या चेहऱ्यांकडे पाहून स्वतःबद्दल कमी आकर्षण वाटतं. ३५% महिलांना वाटतं की आपला लूक बदलल्यास त्यांच्या लाइक्स आणि फॉलोअर्स वाढतील.
स्वस्त सर्जरी, पण वाढतोय धोका
अनेक महिला आता महागड्या उपचारांपासून वाचण्यासाठी तुर्कीसारख्या देशांमध्ये जात आहेत, जिथे कमी खर्चात कॉस्मेटिक सर्जरी केल्या जातात. मात्र तिथे अनेक अनियमित आणि असुरक्षित क्लीनिक वेगाने वाढत आहेत, ज्यामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर धोके निर्माण होत आहेत. यामुळे ब्रिटन सरकारने अलीकडेच अशा क्लीनिकवर कडक नियमावली लागू केली आहे.
बदलती मानसिकता
कॉस्मेटिक सर्जरी आता फक्त वयानुसार सौंदर्य टिकवण्यासाठी नसून, 'सेल्फ-इमेज सुधारण्याचं साधन' बनली आहे. सोशल मीडियाच्या या युगात जिथे प्रत्येकजण 'पिक्चर-परफेक्ट' दिसू इच्छितो, तिथे ही गोष्टही तितकीच खरी आहे की, या परिपूर्णतेच्या हव्यासात तरुण महिला आपल्या नैसर्गिक सौंदर्यापासून आणि आत्मविश्वासापासून हळूहळू दूर जात आहेत.
