आजकाल शरीरावरील केस काढणे अगदीच सोपे झाले आहे. न दुखता काहीही त्रास न होता करता येणाऱ्या हेअर रिमव्हूवर टेकनिक्स आता सगळीकडे वापरल्या जातात. केस काढण्याचे अनेक उपाय उपलब्ध आहेत जसे की रेझर, थ्रेडींग, वॅक्सिंग आदी. आता लेझर पद्धतीचाही वापर केला जातो. मात्र या उपायांचा त्वचेवर थोडा फार परिणाम होतोच. त्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. हा होणारा परिणाम लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा रेझर वापरल्यावर त्वचा झोंबायला लागते. खाज येत तसेच रॅशही येते. सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे थ्रेडींग. चेहर्यावर थ्रेडींग करताना विशेषतः आयब्रो किंवा अप्परलिप्स केल्यावर त्वचेवर फार ताण पडतो. त्यामुळे सूज, लाल चट्टे किंवा त्वचा कोरडी होते.
थ्रेडींग करताना केस ओढले जातात. त्वचेवर त्याचा ताण येतो. त्यामुळे त्वचेला सूक्ष्म जखमा होतात, त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर त्यामुळे डाग किंवा पुरळ होण्याची शक्यता असते. म्हणूनच थ्रेडींग केल्यावर, रेझर वापरल्यावर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.
यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय त्वचेचा त्रास कमी करतात आणि नैसर्गिकरित्या तिचे रक्षण करतात.
१. कोरफडीचा अर्क (Aloe Vera Gel)- थ्रेडींग किंवा रेझरनंतर त्वचेवर कोरफडीचा ताजा अर्क लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि सूज येत नाही. पार्लरमध्येही थ्रेडींग नंतर हे जेल लावले जाते. त्यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि झोंबत नाही. कोणतीही ब्यूटी ट्रिटमेंट करत असाल तर त्वचेला हे जेल लावणे फायद्याचे ठरते.
२. गुलाबपाणी (Rose Water)- गुलाबपाणी फक्त सुगंधीच नसते तर त्यात अनेक गुणधर्म असतात. गुलाबपाणी त्वचा शांत करते, त्यामुळे थ्रेडींगनंतर चेहऱ्यावर गुलाबपाणी लावणं खूप उपयुक्त ठरते. तसेच शरीरावरील केस काढल्यावर गुलाबपाणी लावणे नक्कीच थंडावा देते.
३. थंड दूध- कापसावर थोडे थंड दूध घेऊन त्वचेवर फिरवल्यास जळजळ कमी होते आणि त्वचेला पोषण मिळते. त्यामुळे चेहर्याला आठवड्यातून दोनदा असे थंड दूध लावणे एकदम फायद्याचे ठरते.
बर्फ - थ्रेडींग झालेल्या भागावर हलकासा बर्फ फिरवल्यास त्वचेला लगेच थंडावा मिळतो आणि रॅशेस येण्याची शक्यता कमी होते. बर्फामुळे त्वचा मऊ-मुलायम राहते.
हे असे सर्व उपाय करायला अगदी फक्त पाच मिनिटांचा वेळ लागतो. पण त्वचेसाठी ते फारच फायदेशीर ठरतात. सुंदर दिसण्यासाठी काळजी घेणे आवश्यकच आहे, पण ती योग्य पद्धतीने घेतली तर सौंदर्य अधिक खुलते. त्यामुळे हे उपाय नेहमी करत राहा.