Monsoon Health Tips: सध्या सगळीकडे पावसाला चांगली सुरूवात झाली आहे. कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम सरी बरसत आहे. मग आता पावसाच्या रिमझिम सरींचा आनंद घ्यायचा नाही तर कधी घ्यायचा? असा विचार करत अनेकजण पावसात भिजतात, तर काही लोक ऑफिसमध्ये जाता-येता किंवा बाजारात जाता-येता पावसात भिजतात. बरेच लोक तर भिजलेले कपडे तसेच अंगावर ठेवत काम करतात. हेल्थ एक्सपर्टनुसार, भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. असं केल्यास सर्दी-पडसा, खोकला, ताप आणि स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशात पावसात जर भिजले असाल तर काय करायला हवं? याबाबत डॉक्टर काय सांगतात हे समजून घेऊया.
डर्मेटोलॉजिस्ट डॉ. युगल राजपूत यांनी News18 ला सांगितलं की, 'जर तुम्ही पावसात भिजले असाल तर घरी येऊन लगेच कोमट पाणी अंगावर घ्या. असं केल्यास शरीरावर जमा झालेले बॅक्टेरिया आणि कीटाणू निघून जातात. कोमट पाण्यानं शरीराला लगेच उष्णता मिळते आणि सर्दी-पडस्यापासून बचाव होतो. पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे शरीराचं तापमान अचानक कमी होतं, ज्यामुळे आपल्याला सर्दी किंवा वायरल इन्फेक्शन होऊ शकतं. अशात कोमट पाणी किंवा तुळशी, आलं आणि मधाचा चहा फायदेशीर ठरतो. यानं शरीराचं तापमान सामान्य होतं आणि इम्यून सिस्टीमही मजबूत राहतं.
डॉक्टर सांगतात की, पावसात भिजल्यानंतर शरीर आतून मजबूत करणं गरजेचं असतं. अशात व्हिटामिन सी असलेल्या गोष्टी जसे की, लिंबू पाणी, आवळा, संत्री, आलं, हळदीचं दूध आणि ताजी फळं खावीत. याने इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता वाढते. पावसाच्या दिवसांमध्ये पौष्टिक आहारच सगळ्यात मोठं औषध आहे. जर पावसात भिजल्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा शिंका येत असतील तर दुर्लक्ष करू नका. ही सायनस, वायरल किंवा फ्लू ची सुरूवात असू शकते. अशावेळी काही घरगुती उपाय करा जसे की वाफ घ्या, काढा प्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
एक्सपर्ट म्हणाले की, पावसाचं पाणी बऱ्याचदा दूषित आणि अॅसिडिक असतं, जे त्वचा आणि केसांचं नुकसान करतं. त्यामुळे भिजल्यानंततर त्वचेवर मॉइश्चरायजर नक्की लावा आणि चांगल्या शाम्पूनं केस धुवा. यानं केसांमध्ये कोंडा, खाज आणि स्किन अॅलर्जीचा धोका कमी होतो. जर या गोष्टी आपण फॉलो केल्या तर पावसात भिजल्यावरही तुम्ही सर्दी-पडसा किंवा इतर आजारांपासून दूर रहाल. पावसाचा आनंद तर घ्याच, पण सोबतच काळजीही घ्या.