रात्रीची अपुरी झोप, सतत मोबाइल-लॅपटॉपचा वापर, ताणतणाव किंवा शरीरात पाणी कमी होणे या कारणांमुळे डोळे सुजलेले, झोपाळलेले आणि मलूल दिसू लागतात. चेहऱ्याचा सगळा फ्रेशनेस डोळ्यांवर अवलंबून असतो. (Do your eyes look tired due to mobile and work? Try these home remedies, your eyes will look beautiful and fresh.)त्यामुळे डोळे टवटवीत दिसण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय उपयोगी पडू शकतात.
सर्वात सोपा उपाय म्हणजे थंड पाण्याचा शेक. फ्रिजमध्ये ठेवलेले चमचे किंवा थंड पाण्यात भिजवलेला स्वच्छ कापडाचा तुकडा डोळ्यांवर काही मिनिटे ठेवावा. थंडावा मिळाल्याने सूज कमी होते आणि रक्ताभिसरण सुधारते. शिवाय थंड पाणी थेट लावायचे त्याचाही फायदा होतो. त्याचप्रमाणे गुलाबपाणी थंड करुन त्यात कापसाचे बोळे भिजवून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
काकडीच्या चकत्या ठेवणे हा जुना पण प्रभावी उपाय आहे. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ती डोळ्यांची सूज कमी करण्यात मदत करते. १० ते १५ मिनिटे काकडीच्या थंड चकत्या डोळ्यांवर ठेवल्यास थकवा कमी जाणवतो. बटाट्याच्या पातळ चकत्याही सूज आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात
टी बॅगही उपयोगी ठरते. ग्रीन टी किंवा साधा चहाच्या वापरलेल्या पिशव्या थंड करुन डोळ्यांवर ठेवाव्यात. चहातील अँटी ऑक्सिडंट्स सूज कमी करण्यास मदत करतात. मात्र पिशव्या पूर्ण थंड झालेल्या असाव्यात, गरम नसाव्यात याची काळजी घ्यावी.
डोळ्यांभोवती हलक्या हाताने मसाज करणेही फायदेशीर ठरते. बदाम तेल किंवा खोबरेल तेलाचे काही थेंब घेऊन अतिशय सौम्यपणे मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा मऊ राहते. मात्र डोळ्यांच्या आत तेल जाऊ नये याची खबरदारी घ्यावी.
घरगुती उपायांबरोबरच काही सवयी बदलणे आवश्यक आहे. दररोज किमान ७ ते ८ तास झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसभरात पुरेसे पाणी पिणे, जास्त मीठ टाळणे आणि स्क्रीन टाइम कमी करणे यामुळेही डोळ्यांची सूज कमी होते. लॅपटॉप किंवा मोबाइल वापरताना २०-२०-२० नियम पाळावा – दर २० मिनिटांनी २० सेकंद २० फूट दूर पाहावे. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो.
जर डोळ्यांची सूज वारंवार होत असेल, वेदना, लालसरपणा किंवा दृष्टी कमी होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण कधी कधी अॅलर्जी किंवा इतर आरोग्य समस्या यामागे कारणीभूत असू शकतात.
