चेहर्यावर पिंपल्स येणे ही आजच्या काळातील अत्यंत सामान्य समस्या आहे. वेगवेगळी कारणे यामागे असू शकतात. वाढते प्रदूषण, उन्हाचा त्रास, आहार आदी अनेक कारणे असतात त्यापैकीच दोन महत्वाची कारणे म्हणजे अपचन आणि केसातील कोंडा. अपचनामुळे पोटाचे विकार होतात मात्र त्वचेवरही त्याचा परिणाम होतो.
आपल्या शरीरातील पचनसंस्था योग्य रीतीने काम करत नसल्यास त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. अपचन झाल्यास अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. तसेच विषारी द्रव्ये बाहेर न जाता रक्तामध्ये मिसळतात. हीच अशुद्धता चेहर्यावरील रोमछिद्रांत साठते आणि पिंपल्स तयार होतात. वारंवार गॅस होणे, आंबट ढेकर येणे अशा लक्षणांमुळे चेहर्यावर पिंपल्स येतात. म्हणूनच पचन सुधारले तर त्वचेवरची ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. साधे, हलके आणि पचायला सोपे अन्न खाल्ल्यास किंवा वेळेवर खाल्ल्यास अपचनामुळे होणारे पिंपल्स टाळता येतात.
डोक्यातला कोंडा केसांचे नुकसान तर करतोच मात्र त्यामुळे कपाळावर आणि गालावरही पिंपल्स येतात. डोक्याच्या त्वचेवर कोंडा झाल्यास तो चेहऱ्यावर किंवा मानेवर उतरतो आणि त्वचेची स्वच्छता बिघडते. त्यामुळे त्या भागात जंतूंची वाढ होऊन पिंपल्स तयार होतात. विशेषतः कपाळावर, भुवयांच्या आसपास किंवा मागच्या बाजूस मानेला पिंपल्स दिसून येतात. काही वेळा कोंड्यामुळे होणारे पिंपल्स खूप लालसर आणि खाजणारे असतात. कोंडा नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य शाम्पूचा वापर करणे, केस व त्वचा स्वच्छ ठेवणे आणि तेलकटपणा कमी करणे आवश्यक आहे.
याशिवाय हार्मोनल बदल, जास्त तेलकट पदार्थ खाणे, ताणतणाव, झोपेचा अभाव, धूळकण व प्रदूषण यामुळेही पिंपल्स वाढतात. मात्र ही कारणे सगळ्यांनाच माहिती असतात. त्यावर उपाय करुनही जर पिंपल्स येतातच तर मग गडबड पोटात असू शकते. खरेतर अपचन आणि कोंडा या दोन समस्या वेळेवर हाताळल्या तर चेहर्यावरील पिंपल्स मोठ्या प्रमाणात टाळता येतात आणि त्वचा निरोगी राहते.