सुंदर दिसण्यासाठी केल्या जाणाऱ्या घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बेसन. बेसन चेहऱ्याला लावणे हा उपाय घरोघरी केला जातो. (Do you apply gram flour to your face? these mistakes will ruin the glow of your face forever, read before trying besan mask )वर्षानुवर्षे हा उपाय चालत आला आहे. पण अनेकदा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. जसे की प्रत्येक उपाय सगळ्यांनाच सारखा फायदे देत नाही. तसेच काही जणांनी बेसनाचा मास्क लावणे टाळायला हवे. त्याचे कारण जाणून घ्या.
त्वचेचा पोत पाहून नंतरच उपाय करावेत. कोरड्या त्वचेसाठी बेसन फारसे उपयुक्त ठरत नाही. बेसनामध्ये त्वचेतील नैसर्गिक तेल शोषून घेण्याची क्षमता असते. जेव्हा कोरड्या त्वचेलव बेसन लावलं जात, तेव्हा ती अधिक कोरडी, रापलेली आणि ताणलेली वाटू लागते. त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. खाज सुटू शकते आणि त्वचेला हात लावल्यावर खरखर जाणवते. त्वचा आणखीच कोरडी होईल.
काहींची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. अशी त्वचा असलेल्या लोकांनीही बेसन वापरण्यापूर्वी काळजी घ्यायला हवी. संवेदनशील त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा सूज लगेच येऊ शकते. काही लोकांच्या त्वचेवर बेसन लावल्यावर पुरळ उठते.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जर चेहर्यावर एखादी जखम, पिंपल्स, त्वचेचे इन्फेक्शन, एक्जिमा, सोरायसिस किंवा कुठलाही त्वचारोग असेल, तर बेसन लावणे धोकादायक ठरू शकते. बेसन जरी नैसर्गिक असले तरी ते त्या संवेदनशील भागावर लावल्यामुळे संसर्ग वाढू शकतो. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपाय करावे.
काही लोकांना बेसनाची ॲलर्जी असू शकते. ॲलर्जी असेल तर पटकन कळून येत नाही. त्यामुळे जर बेसन लावल्यावर त्याचा त्रास झाला तर पुन्हा लावू नका. चेहऱ्याला बेसन लावल्यावर त्वचा सुजणे, खाज येणे किंवा त्वचेला चट्टे पडणे असे काही झाले तर हा उपाय तुमच्या त्वचेसाठी नाही असा त्याचा अर्थ होतो.
बेसन वापरण्याचे काही तोटेही आहेत. जे सहसा दुर्लक्षित केले जातात. वारंवार किंवा दररोज बेसन वापरल्यास त्वचेतून नैसर्गिक ओलावा आणि तेल पूर्णपणे निघून जाते. परिणामी त्वचा कोरडी होऊ लागते. अनेक वेळा असंही दिसून येतं की बेसनामुळे त्वचा अधिक गोरी होण्याऐवजी निस्तेज होऊ लागते. बेसन वापरा मात्र वापरताना काळजी घ्या.