Join us  

प्री वेडिंग फोटो शूट तर केलं, पण प्री वेडिंग डिटॉक्सचं काय? ग्लोइंग फेस हवा तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 3:15 PM

लग्नात नवरी मुलीने सुंदर दिसायला हवं ना, मग त्यासाठी थोडी आधीपासून तयारी करा, तुमचाही चेहरा करेल मस्त ग्लो...

ठळक मुद्देखरेदी आणि गडबड यांमुळे नवऱ्या मुलीला स्वत:कडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाहीपाहूयात नवऱ्या मुलीने लग्नाआधी आहाराबाबत काय काळजी घ्यायला हवी.

लग्नसराई सुरु झाली की लग्नघरात हॉल बुकींग, खरेदी, गुरुजी, पत्रिका, लग्नाचे निमंत्रण देण्याची लगबग, इतर विधी, मेहंदी, मेकअप यांची तयारी अशी सगळी धामधून सुरु असते. प्रत्येकाचे सगळे बघता बघता आणि स्वत:ची खरेदी करता करता नवरी मुलगीही पार थकून जाते. त्यातच हल्ली प्री वेडींग शूट त्याची खरेदी आणि गडबड यांमुळे नवऱ्या मुलीला स्वत:कडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. त्यातच ऑफीस वगैरे असेल तर विचारायलाच नको. केळवणं, जागरण, खरेदी आणि इतर तयारीमुळे होणारी दगदग आणि मनाची चलबिचल अवस्था यांमुळे चेहरा पार उतरुन जातो. पण ऐन लग्नात चेहऱ्यावरील सौंदर्य खुलायला तर हवेच. डोळ्यांखालील काळे डाग, गालावरील पिंपल्स, डाग हे सगळे जाऊन चेहरा उजळ दिसावा यासाठी मेकअप असतोच. पण आधीपासून काही तयारी केली तर तुमचे आरोग्यही चांगले राहते आणि नकळत सौंदर्यातही भर पडते. पाहूयात नवऱ्या मुलीने लग्नाआधी आहाराबाबत काय काळजी घ्यायला हवी. कोणत्या सूपरफूडचा आहारात समावेश केल्यास नैसर्गिकरित्या तुमच्या सौंदर्यात भर पडेल याविषयी...

(Image : Google)

१. चरबीमध्ये मिसळणारे पदार्थ - पपई, गाजर, पालक, आंबा, रताळे, टोमॅटो यासारखे व्हीटॅमिन्सचे प्रमाण जास्त असलेले पदार्थांचा आहारात असायला हवा. हे पदार्थ आपल्या शरीरात चांगल्या पद्धतीने मिसळतात आणि चेहऱ्यावर चमक येण्यासाठी त्याची मदत होते. 

२. व्हीटॅमिन इ युक्त पदार्थ - काजू, बदाम, आक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, फुटाणे यांसारख्या विविध प्रकारच्या दाण्यांमुळे शरीराला इ व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात मिळते. या पदार्थांमधील घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 

३. व्हीटॅमिन सी युक्त पदार्थ - व्हीटॅमिन सी हे त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. लिंबू, संत्री, किवी, पेरु, ब्रोकोली, शिमला मिर्ची यांतून शरीराला सी व्हीटॅमिन मिळते. 

४. विविध प्रकारच्या बिया - जवस, कलिंगडातील बिया, लाल भोपळ्यातील बिया खाल्ल्याने शरीराला फायबर, शरीरासाठी आवश्यक असलेले फॅटस, प्रथिने आणि खनिजे मिळण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा नितळ दिसण्यास मदत होते. 

(Image : Google)

५. ग्रीन टी - ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला माहित आहे. मात्र तो कधी आणि कसा घ्यावा याविषयी योग्य ती माहिती घ्यायला हवी. ग्रीन टी मुळे बॉडी डीटॉक्स होण्यास मदत होते. तसेच शरीरातील काही कारणाने हानी झालेल्या पेशींमध्ये सुधारणा होण्यास मदत होते. तसेच यामुळे शरीरावरील वाढलेली चरबी जळण्यासही मदत होते. 

६. पाणीदार फळे आणि भाज्या - कलिंगड, खरबूज, काकडी यांसारख्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला हवा. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यास मदत होते आणि नकळत त्याचा त्वचा चांगली राहण्यावर परिणाम होतो. 

७. फळांचा समावेश - फळांमध्ये जास्त प्रमाणात व्हीटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. तसेच फळांमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटसमुळे शरीरातील नको असलेले घटक बाहेर फेकण्यास मदत होते. त्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे आहारात फळांचा समावेश ठेवा. 

८. भरपूर पाणी प्यायला हवे - तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके तुमचे शरीर ताजेतवाने राहण्यास मदत होते. याचे कारण म्हणजे खाल्लेले अन्न पचण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तसेच पोट साफ राहण्यासाठी आणि पचनक्रीयेसाठी शरीराला पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायल्याने अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी डोके वर काढतात. मात्र लक्षात ठेऊन सतत पाणी प्यायला हवे. त्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व क्रिया सुरळीत होतात आणि त्यामुळे त्वचा चांगली दिसण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना