Underarms Dark Patch: काखेत काळे डाग पडणं ही एक कॉमन समस्या आहे. महिलांसोबतच पुरूषांना देखील ही समस्या होते. हे काळे डाग किंवा चट्टे दिसायला फारच वाईट दिसतात. अनेकांसाठी ही लाजिरवाणी बाब ठरते. खासकरून महिलांना डार्क अंडरआर्म्समुळे स्लीव्हलेस कपडे घालायला मिळत नाही. पण दिलासादायक गोष्ट म्हणजे योग्य काळजी आणि योग्य प्रॉडक्ट्स वापरल्यास ही समस्या बरीचशी कमी करता येते. याच विषयावर त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुरभी बालानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अंडरआर्म्सवरील डार्कनेस कमी करण्याचा सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. चला पाहुयात त्यांनी काय सांगितले उपाय.
काखेत काळ्या डागांची कारणं?
आपल्याला माहीत आहेच की, काखेतील त्वचा फारच संवेदनशील असते. वारंवार शेव्हिंग केल्याने त्वचेवर मायक्रो कट्स पडतात, ज्यामुळे पिग्मेंटेशन वाढू शकते. याशिवाय वॅक्सिंग, जास्त घाम येणे, घट्ट कपडे घालणे आणि डिओडरंटचा अति वापर ही सुद्धा अंडरआर्म्स काळवंडण्याची प्रमुख कारणे आहेत. या सगळ्या कारणांमुळे तिथे डेड स्किन जमा होते आणि त्वचा हळूहळू डार्क दिसू लागते.
अंडरआर्म्सची डार्कनेस कशी कमी करावी?
यासाठी त्वचारोगतज्ज्ञ ग्लायकोलिक अॅसिड वापरण्याचा सल्ला देतात. Glycolic Acid हा प्रकारातील घटक आहे. तो त्वचेच्या वरच्या थरातील डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतो. डेड स्किन निघून गेल्यावर डार्क पॅचेस हळूहळू फिके पडू लागतात. ग्लायकोलिक अॅसिड त्वचेचा टेक्स्चर स्मूद करतो आणि अंडरआर्म्स अधिक स्वच्छ व उजळ दिसण्यास मदत करतो.
अंडरआर्म्सवर ग्लायकोलिक अॅसिड कसे वापरावे?
डॉ. सुरभी बालानी यांच्या मते, ग्लायकोलिक अॅसिड टोनर स्वच्छ आणि कोरड्या अंडरआर्म्सवर लावून तसेच ठेवावे. लावल्यानंतर त्वचा धुण्याची गरज नसते. पहिल्यांदा वापरत असाल तर आधी पॅच टेस्ट नक्की करा. तसेच आठवड्यातून फक्त 1 ते 2 वेळाच वापरा.
या गोष्टी लक्षात ठेवा
ग्लायकोलिक अॅसिड लावलेल्या दिवशी शेव्हिंग किंवा वॅक्सिंग करू नका.
लावल्यानंतर हलका, फ्रेग्रन्स-फ्री मॉइश्चरायझर वापरा.
रोज वापर टाळा आणि खूप घट्ट कपडे घालू नका.
किती दिवसांत परिणाम दिसेल?
डर्मेटोलॉजिस्ट सांगतात की नियमित आणि योग्य वापर केल्यास 3–4 आठवड्यांत अंडरआर्म्सचा रंग हलका दिसू लागतो आणि त्वचा अधिक स्मूद वाटते. खूप जास्त डार्क पॅचेस असतील तर थोडा अधिक वेळ लागू शकतो.
जर जळजळ, खाज किंवा रॅश जाणवला, तर त्वरित वापर थांबवा आणि त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. योग्य प्रॉडक्ट आणि योग्य पद्धत वापरून तुम्ही तुमचे अंडरआर्म्स स्वच्छ आणि स्मूद बनवू शकता.
