ओठांसाठी फार वेगळी अशी काही काळजी घ्यावी लागत नाही. मात्र काही वेळा ओठ फारच काळे पडतात. त्वचा कोरडी होते आणि त्यातून रक्तही येते. ओठ झोंबतात. छान गुलाबी ओठ काळे दिसायला लागले की चेहऱ्याचा तजेलपणा कमी होतो. यामागे मुख्य कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. (Dark, dry lips will become soft and pink - 5 easy remedies to do at home, beauty tips)एवढेच नाही तर जास्त प्रमाणात चहा-कॉफी किंवा धूम्रपान, रासायनिक लिपस्टिकचा अतिरेक, झोपेची कमतरता तसेच सूर्यप्रकाशाचा परिणाम, आदी काही कारणेही असतात. कधी कधी जीवनसत्त्वांची कमतरताही ओठांच्या रंगावर आणि मऊपणावर परिणाम करते. मात्र काही घरगुती उपायांनी ओठांचे सौंदर्य पुन्हा मिळवता येते.
१. ओठ सुंदर आणि गुलाबी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य प्रमाणात पाणी पिणं. दिवसातून आठ-दहा ग्लास पाणी प्यायल्यावरच ओठांना आवश्यक ओलावा मिळतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास फक्त ओठ नाही तर सगळीच त्वचा कोरडी होते.
२. घरच्या घरी करता येणारे काही सोपे उपाय आहेत. गुलाबपाणी आणि मध एकत्र करून त्याचा हलका लेप ओठांवर लावल्याने ओलावा टिकतो आणि रंगही उजळतो. नुसते गुलाबपाणी लावले तरी फायदा होतो. मध सगळ्यांनाच सुट होते असे नाही.
३. खोबरेल तेलाने हलकी मालीश केल्याने ओठ मऊ होतात. तेल लावण्याआधी साखर आणि मध या मिश्रणाने हलकेच स्क्रब केल्याने ओठांवरील मृत त्वचा काढता येते. आठवड्यातून दोनदा जरी केले तरी पुरे होते.
४. विकतच्या उपायांपेक्षा होममेड मास्क वापरा. त्यासाठी हळद आणि दुधाची पेस्ट उत्तम उपाय आहे. हळद त्वचा निरोगी ठेवते आणि दूध मऊपणा राखते. हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म ओठांचं आरोग्य राखतात तर दुधातील लॅक्टिक अॅसिड काळेपणा कमी करतं.
५. तंबाखू, धूम्रपान, जास्त कॅफिन यापासून दूर राहणं आणि आहारात फळं-भाज्या, जीवनसत्त्व 'ई' युक्त पदार्थांचा समावेश करणं हेही तितकंच गरजेचं आहे. हे सोपे उपाय नियमित पाळल्यास कोरडे व काळे पडलेले ओठ नैसर्गिकरित्या सुंदर, आकर्षक आणि निरोगी दिसू लागतात.