डोक्यात कोंडा होण्याचं मुख्य कारण म्हणजे टाळूवरचं जास्त तेल, घाम, धूळ आणि फंगल इन्फेक्शन याचं प्रमाण वाढणं. काही वेळा चुकीचा शॅम्पू वापरणं, वारंवार केस धुणं किंवा खूप दिवस न धुणं यामुळेही कोंडा होतो. हवामान बदल, आहारातील असंतुलन आणि ताणतणाव यांचाही परिणाम टाळूवर होतो. (continuously itching your head? Instead of getting irritated by constant itching, try these 4 simple remedies)कोंड्यामुळे टाळू कोरडा पडतो. पांढऱ्या कणांचा थर तयार होतो आणि त्यातून खाज सुटते. टाळूतील तेल आणि मृत पेशी एकत्र येऊन Malassezia नावाच्या बुरशीला वाढण्यास पोषक वातावरण मिळतं, त्यामुळे खाज आणि कोंडा वाढतो. घरगुती साध्या उपायांनी खाज कमीही करता येते.
१. खोबरेल तेल आणि लिंबूरस – दोन चमचे गरम खोबरेल तेलात एक चमचा लिंबूरस मिसळा आणि टाळूवर हळूवार मालिश करा. लिंबातील सायट्रिक आम्ल कोंडा कमी करते, तर खोबरेल तेल टाळूला ओलावा देते. हे मिश्रण अर्धा तास ठेवल्यानंतर हलक्या शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.
२. दही आणि मेथी पेस्ट – मेथी दाणे रात्री भिजवून सकाळी वाटून त्यात दही घाला आणि केसांवर लावा. या पेस्टमुळे टाळू थंड होते, खाज कमी होते आणि कोंडा दूर होतो. दहीतील लॅक्टिक आम्ल टाळूतील बुरशी नष्ट करतं.
३. आलोवेरा जेल – शुद्ध आलोवेरा जेल टाळूवर लावून ३० मिनिटं ठेवा. त्यातील अँटिफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे टाळू स्वच्छ राहतो. यामुळे खाज कमी होते आणि केसांना मऊपणा येतो.
४. कडूनिंब पाण्याचा वापर – कडूनिंबाची पाने उकळून ते पाणी गार करा आणि केस धुतल्यानंतर शेवटी त्या पाण्याने टाळू धुवा.त्यात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे कोंडा निर्माण करणारी बुरशी नष्ट होते. हा उपाय टाळू स्वच्छ ठेवतो आणि खाज कमी करतो. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास फरक जाणवतो.
कोंड्याचा त्रास टाळण्यासाठी सर्वात आधी टाळूची स्वच्छता महत्त्वाची आहे. आठवड्यातून किमान दोनदा केस धुवावेत आणि शक्यतो सौम्य, नैसर्गिक घटक असलेला शॅम्पू वापरावा. खूप गरम पाण्याने केस धुण्याने टाळू कोरडा पडते, त्यामुळे कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा. केस धुतल्यानंतर टॉवेलने जोरात पुसू नका, हलक्या हाताने कोरडे करा.