Lokmat Sakhi >Beauty > जिवाची लाही लाही होतेय! उन्हाच्या तडाख्यात आजारी पडायचे नसेल तर तातडीने खाण्यापिण्यात ‘हा’ बदल करा..

जिवाची लाही लाही होतेय! उन्हाच्या तडाख्यात आजारी पडायचे नसेल तर तातडीने खाण्यापिण्यात ‘हा’ बदल करा..

उन्हाचा तडाखा असताना काय खावे, काय प्यावे आणि काय टाळावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 17:36 IST2025-05-05T17:33:56+5:302025-05-05T17:36:50+5:30

उन्हाचा तडाखा असताना काय खावे, काय प्यावे आणि काय टाळावे?

change you food, summer special, avoid sunstroke, heat stroke | जिवाची लाही लाही होतेय! उन्हाच्या तडाख्यात आजारी पडायचे नसेल तर तातडीने खाण्यापिण्यात ‘हा’ बदल करा..

जिवाची लाही लाही होतेय! उन्हाच्या तडाख्यात आजारी पडायचे नसेल तर तातडीने खाण्यापिण्यात ‘हा’ बदल करा..

Highlightsउन्हातून घरी आल्याबरोबर पायांवर व डोळ्यांवर गार पाण्याचे हबके द्यावे.

- डॉ. सुचेता अश्विन सावंत (आयुर्वेद आणि संस्कृत तज्ज्ञ)

मे महिना जवळ आला, सूर्य आग ओकतो आहे. वैशाखात ऊन तापले की, सर्व पशू-पक्षी सावलीत जाऊन सुस्तावतात. थोडेसे काम केले, तरी खूप थकवा येतो. उन्हाच्या काहिलीने म्लानता येते आणि हालचाली मंदावतात. दुपारी रहदारी थांबते, रस्ते ओस पडून शुकशुकाट होतो. अशावेळी घरी मुलांचा गोंगाट सुरू होतो, कारण परीक्षा संपून सुट्ट्या लागतात. लहान मुलांना गरमीचा त्रास होत नाही, कारण उष्णतेशी त्यांचे शरीर सहज समतोल साधते. हळद-तिखट व वाळवणाची कामे काही घरी सुरू असतात. पाहुणे येतात. त्यातच घरभरणीचे व लग्नाचे मुहूर्त असतील, तर मग गृहिणीच्या सहनशीलतेची परीक्षाच. कोकम सरबत कर कुणी म्हणते, तर कुणी कोकमाचे नको, लिंबाचे दे, अशी मागणी करते. तर मग कधी आवळा, तर कधी कलिंगडाचे असे रोज-रोज नवे सरबत करून कंटाळून शेवटी मग लिंबाचा साखरेच्या पाकात चांगला बाटलीभर सुधारस करून ठेवत असे. कैऱ्या उकडून गूळ, मिरी, जिरे, वेलची टाकून मस्त पन्ह्याचा बेत असे.
हल्ली घरात हे सारे होते. पण, बाजारातली शीतपेयेही सर्रास येतात. या सर्व शीतपेयांमध्ये अतिप्रमाणात साखर आहे, जे भविष्यात होऊ घातलेल्या डायबिटीसचे कारण आहे. एवढेच नव्हे, तर शीतपेयांचे दळणवळण होते ते ट्रक-टेम्पो भर उन्हात उभे असतात. ज्या दुकानातून आपण थंडा विकत घेतो, त्यांच्याकडेही या प्लॅस्टिकच्या बाटल्या उन्हात तापत असतात. त्यामुळे मायक्रोप्लॅस्टिकचे अंश आपल्या पोटात जातात व कॅन्सरसारख्या भयंकर आजाराला आमंत्रण मिळते.

उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी खायचे-प्यायचे काय?

१. उन्हाळा आणि आंबा हे समीकरण तर पक्के जुळलेले असते. पण, विकत आणलेले आंबे आधी पाण्यात बुडवून ठेवायचे नंतर आमरस काढून त्यात थोडी मिरपूड टाकली की, घरात कोणाला काही त्रास होणार नाही. असे केल्याने घरात मुलांना आंब्याने गळवे येत नाहीत की सर्दी, खोकला व अपचन होत नाही.
२. गावाला आमरस हा कुरडयांशिवाय चालतच नाही. कुठे आमरस-पुरीचा बेत असतो, तर कुठे भातात कालवून आमरस खाल्ल्ला जातो. मध्येच कधीतरी ओळखीतून चांगला मधाळ आंबा हाती लागला की, त्याचा रस ताटात पसरवून आंबापोळी करून ठेवतात. लहान मुलांना ती फार आवडते व त्यातून मुलांना भरपूर अ जीवनसत्त्व मिळते. ती खाणं चांगलंच.

३. आयुर्वेदात श्रीखंडाला रसाला असे नाव आहे. श्रीखंड उन्हाळ्यात आवर्जून खायला हवे, असे आयुर्वेदात सुचवले आहे. पण, ते बाधू नये, म्हणून त्यात सुंठ व मिरी चुर्ण टाकण्याचा सल्लाही दिलेला आहे, जो आपण सहसा पाळत नाही. हल्ली घरी कोणी श्रीखंडही करत नाही. सरळ रेडिमेड श्रीखंड प्लॅस्टिकच्या डब्यातून आणले जाते.
४. उन्हाळ्यात येणारा एकमेव सण म्हणजे अक्षसय तृतीया होय. अक्षय तृतीयेला नवीन माठ आणून त्यात वाळा व आंब्याची कोवळी पालवी टाकून देवापुढे फक्त ठेवायची नसतात, तर त्या दिवसापासून मडक्यातील थंड पाणी प्यायला सुरू करायचे. देवाला आंब्याचा नैवेद्य दाखवून आंबाही अक्षय तृतीयेपासून खाणे सुरू करायचा असतो. आंबा त्याआधी खायचा नसतो. वैशाख वणव्यामुळे शरीरावर घामोळ्या येऊ नये व अति उन्हामुळे नाकाचा घोळणा फुटून रक्तस्राव होऊ नये, म्हणून नवीन माठात वाळा टाकून ते पाणी प्यायचे असते.

५. गरमीच्या दिवसात लहानग्यांना ताडगोळ्याचे सरबत, सोलकढी, गोड नारळाच्या दुधातील तांदळाच्या उकड काढून केलेल्या शेवया, पातळ ताक, लस्सी, शहाळे व त्याच्या विविध पाककृती जरूर करून खायला घालाव्यात.
६. सातूचे पीठ हा उन्हाळ्यातील पौष्टिक पदार्थ आहे, जो नष्टप्राय होत आहे. आयुर्वेदात स्पष्ट सांगितले आहे की, थंडगार पाण्याने आंघोळ घालून मुलांना सातू खायला द्यावा. थकवा घालवणारा आणि ऊर्जा देणारा पारंपरिक खाद्यप्रकार म्हणजे सातू होय.
७. तूप, साय, लोणी, ताक, पनीर, खीर व भरपूर द्रवाहार नियमित घ्यावे. आहार सहज पचेल असा हलका, मधुर, स्निग्ध, पातळ म्हणजे द्रवयुक्त व गुणांनी थंड हवा. काकडी जी अक्षरशः पाण्याने भरलेली असते तिची कोशिंबीर नेहमी जेवणात असावी. ऋतुनुसार येणारी आंबा, केळी, कलिंगड,अननस, फणस, जांभूळ, करवंद, बोर, चिंचा, आवळा, चिकू अशी विविध फळं खाल्ली पाहिजेत.

८. पालेभाज्या, कढी, दहीभात, पातळ भाज्या, सार भाज्या, टोमॅटोचे सार, वेलीवरील भाज्या, भोपळा हे प्रकार वारंवार केले पाहिजेत. चटण्यांमध्ये ओल्या नारळाच्या, आवळ्याच्या, पुदिनाच्या चटणीला विशेष प्राधान्य द्यावे. शेवगा, मेथी, सरसो, करडई टाळावी. घावणे, उपमा, तांदळाची उकड, असे हलके-फुलके पदार्थ नाश्त्याला ठेवावेत.
९. दुपारच्या वेळी पत्ते, कॅरम, बोर्ड गेम खेळत किंवा पुस्तके वाचत घरातच बसावे. उन्हात जावे लागले, तर छत्री, टोपी किंवा स्कार्फ-ओढणीने डोक्याचे संरक्षण करावे. काळा गॉगल घालावा.
१०. रबराच्या वाहाणा न वापरता, चामड्याच्या कोल्हापुरी किंवा जयपुरी वापराव्यात. उन्हातून घरी आल्याबरोबर पायांवर व डोळ्यांवर गार पाण्याचे हबके द्यावे.

काय करूच नये...

१. उन्हातून आल्याबरोबर गटागटा फ्रिजचे गार पाणी पिऊ नये.
२. उन्हाळ्यात आंबवलेले डोसा, इडली, ढोकळा असे प्रकार सहसा खाऊ नये. त्यामुळे पित्त वाढेल व जळजळीचा त्रास होईल.
३. तसेच उन्हाळ्यात कोरडे खाद्यप्रकार जसे बाजरी, थालीपीठ, बेकरीचे पदार्थ, पिझा टाळावेत. कोरडेपणामुळे वातदोष वाढून त्रास होऊ शकतो. या काळात पचनशक्ती कमी असते. त्यामुळे पचायला जड असणारे प्रकारसुद्धा टाळावेत.

sawantdrsucheta@gmail.com

Web Title: change you food, summer special, avoid sunstroke, heat stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.