पपई फार पौष्टिक असे फळ आहे. महिला पाळी वेळेवर यावी यासाठी पपई खातात, मात्र पपई फक्त शरीरातील उष्णताच वाढवत नाही तर त्याचे विविध आरोग्यदायी फायदेही आहेत. पपई हे फळ पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते. मात्र फक्त तेवढेच नाही तर पपई त्वचेसाठीही एक उत्तम नैसर्गिक पोषण देणारा घटक आहे. पपईमध्ये पपेन नावाचे एंझाइम, जीवनसत्त्व 'ए','सी','ई' तसेच अँटी ऑक्सिडंट्स आणि बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणावर असते. हे सर्व घटक त्वचेवरील मृत पेशी दूर करुन त्वचेला पोषण देतात. कोरडेपणा कमी करतात आणि रंग उजळवतात. याशिवाय पपई त्वचा मऊसर होते. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये पपई असते, कारण त्याचे फायदे खूप प्रभावी असतात.
घरी पपईचा मास्क तयार करणे अगदी सोपे आहे. पिकलेल्या पपईचे काही तुकडे घेऊन साल व बिया काढून टाका. मऊसर गर मिक्सरमधून फिरवून घ्या. या गरात एक चमचा मध मिसळल्यास त्वचेला अधिक आर्द्रता मिळते, तर एक चमचा दही घातल्यास त्वचेवरील टॅन कमी होतो आणि थंडावा मिळतो. कोरडी व निस्तेज त्वचा असेल तर या मिश्रणात काही थेंब लिंबाचा रस किंवा गुलाबपाणी घातले तरी चालते. हे तयार मिश्रण चेहऱ्यावर व मानेला हलक्या हाताने लावा. आणि पंधरा ते वीस मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा मास्क लावल्यास त्वचेला नैसर्गिक पोषण मिळते. छिद्रांची स्वच्छता होते आणि त्वचा उजळ दिसते.
पपईतील पपेन डाग, पिग्मेंटेशन, टॅन व सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. त्यातील अँटी ऑक्सिडंट्समुळे त्वचेला येणारी सूज, दाह व मुक्त रॅडिकल्सचे नुकसान कमी होते. नियमित पपई मास्क लावल्याने पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सचा त्रासही कमी होतो. बाजारातील केमिकलयुक्त फेसपॅकच्या तुलनेत हा मास्क पूर्णपणे नैसर्गिक, सौम्य व फायदेशीर आहे. तो त्वचेला आवश्यक पोषण, आर्द्रता व उजळपणा देतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक पोत सांभाळतो. तसेच त्वचा आरोग्यदायी ठेवतो. म्हणूनच पपईचा मास्क हा एक सोपा, सुरक्षित व प्रभावी घरगुती उपाय आहे जो त्वचेसाठी नक्कीच वापरा.