Sunscreen Using Tips : उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करण्यासाठी आजकाल महिला असो वा पुरूष सगळेच वेगवेगळ्या सनस्क्रीनचा वापर करतात. उन्हापासून त्वचेची सुरक्षा करण्यासाठी याचा चांगला फायदा मिळतो. तसेच त्वचा सैल होणे, ड्राय होणे आणि डॅमेज होण्याचाही धोका कमी राहतो. त्यामुळे जास्तीत जास्त महिला सनस्क्रीनचा भरपूर वापर करतात. पण अनेकजण सनस्क्रीन लावताना काही चुका करतात. ज्या टाळायला हव्यात.
सनस्क्रीन लावण्याची वेळ
सामान्यपणे लोक घरातून बाहेर पडणार तेव्हा सनस्क्रीन लावतात. पण असं करू नये. कधीही बाहेर उन्हात जाण्याचा प्लॅन असेल तर बाहेर पडण्याच्या साधारण १० ते १५ मिनिट आधीच सनस्क्रीनचा वापर करा. वेळेचा हा नियम पाळल्यास सनस्क्रीनला त्याचं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि नंतर यानं तुमचा उन्हापासून चांगला बचावही होतो.
केवळ उन्हात लावणं
अनेकांना असं वाटत असतं की, सनस्क्रीन केवळ उन्हातच त्वचेची सुरक्षा करतं. मात्र, असं काही नाही. कोणतही वातावरण असो घरातून बाहेर पडण्याआधी सनस्क्रीन स्किनवर लावू शकता. कारण सनस्क्रीन कोणत्याही वातावरणात आपल्या त्वचेची सुरक्षा करतं.
केवळ एकदा लावणं
जास्तीत जास्त महिला दिवसातून एकदा म्हणजे घरातून बाहेर पडतानाच सनस्क्रीन लावतात. केवळ एकदाच सनस्क्रीन लावणं पुरेसं नाही. सनस्क्रीन दर दोन ते तीन तासांनी पुन्हा लावायला पाहिजे. तसेच स्वीमिंग आणि ड्रायव्हिंग केल्यानंतर सनस्क्रीनचा त्वचेवर वापर आवर्जून करावा.
डार्क त्वचेवर न वापरणं
कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी सनस्क्रीन फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुमची त्वचा जर डार्क असेल आणि तुम्हाला सनस्क्रीनची गरज नाही असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय. सनस्क्रीनने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. त्यामुळे स्किनच्या कोणत्याही टोनसाठी उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीननं लावणं फायदेशीर ठरतं.
एसपीएफची काळजी
सनस्क्रीन खरेदी करताना एसपीएफवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण एसपीएफ सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हे एक रेटींग फॅक्टर आहे जे सांगतं की, कोणतं सनस्क्रीन किंवा सनब्लॉक तुमचा कोणत्या स्तरापर्यंत बचाव करतं.
जुनंच सनस्क्रीन वापरणं
अनेक महिला चूक करतात की, त्या आधीच आणलेलं जुनं सनस्क्रीन वापरतात. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. तुम्ही जुनं सनस्क्रीन कशा स्थितीत ठेवलं यावर त्याचा वापर अवलंबून राहतो. जर ते चुकीच्या पद्धतीनं ठेवण्यात आलं असेल तर ते लावण्याऐवजी नवीन सनस्क्रीनचा वापर करावा.
मेकअपआधी सनस्क्रीन न लावणं
जर तुम्ही मेकअपआधी सनस्क्रीन लावत नसाल तर तुम्ही चुकताय. तुम्ही वापरत असलेल्या काही मेकअप प्रॉडक्टमध्ये एसपीएफ असलं तरी ते सनस्क्रीनच्या तुलनेत त्वचेची सुरक्षा करतं. त्यामुळे मेकअप करण्याआधी सनस्क्रीन लावणं गरजेचं असतं.