चेहऱ्यावरचे केस आजकाल सगळ्याच महिला काढतात. हे अनेक महिलांसाठी त्रासदायक वाटतात. एका प्रमाणापर्यंत फेशिअल हेअर मुलींना असतातच. मात्र हॉर्मोनल बदल, स्ट्रेस, चुकीचा आहार किंवा अनुवंशिक कारणांमुळे प्रमाणापेक्षा जास्त केस वाढतात. (4 natural remedies to reduce upper lip and facial hair growth, forget constant threading and waxing)अनेकजणी हे केस काढण्यासाठी वारंवार थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा रेझरचा वापर करतात, पण हे उपाय तात्पुरते ठरतात आणि काही वेळा केस अधिक जाड, काळे आणि कठीण होतात. त्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती उपायांनीच केसांची वाढ आणि घनता कमी करता येते.
सर्वप्रथम लक्षात ठेवा, चेहऱ्यावर रेझर फिरवणं किंवा वारंवार थ्रेडिंग करणं टाळायला हवे. यामुळे त्वचेवर सूक्ष्म ओरखडे पडतात, ओपन पोर्स वाढतात आणि केस आणखी जाड दिसू लागतात. त्याऐवजी सौम्य, नैसर्गिक उपाय निवडा.
१. हळद आणि बेसन पॅक:
थोडं बेसन, चिमूटभर हळद आणि थोडं दूध एकत्र करुन पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि अर्धवट सुकल्यावर वरच्या दिशेने टिश्यू पेपर फिरवून काढून टाका. आठवड्यातून दोनदा केल्यास केसांची वाढ हळूहळू कमी होते.
२. मसूर डाळ आणि दूध पॅक:
मसूर डाळ रात्रभर भिजवून वाटून घ्या. त्यात थोडं दूध आणि मध मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावायचा. पूर्ण सुकल्यावर पाण्याने धुवा. मसूर डाळ त्वचेवरील केस मुळापासून काढून टाकते. तसेच त्वचेचा पोत सुधारते.
३. पपई आणि हळद:
कच्च्या पपईत 'पपेन' हे एन्झाइम असतं, जे केसांची मुळं कमकुवत करतं. पपईचा गर आणि चिमूटभर हळद एकत्र करुन चेहऱ्यावर हलक्या हाताने मालीश करा आणि १५ मिनिटांनी धुवा. नियमित वापराने केसांची जाडी कमी होते.
४. साखर आणि लिंबाचा स्क्रब:
साखर, लिंबाचा रस आणि मध एकत्र करुन तयार केलेला स्क्रब केसांची वाढ नैसर्गिकरित्या कमी करतो आणि त्वचा स्वच्छ ठेवतो. हा स्क्रब आठवड्यातून दोनदा वापरा.
हे उपाय सातत्याने केल्यास काही आठवड्यांत केसांची जाडी आणि घनता कमी झाल्याचं जाणवेल. पण हे सर्व नैसर्गिक उपाय आहेत, त्यामुळे धीराने वापर करणं महत्त्वाचं आहे. लगेच काही दिवसात फरक जाणवत नाही. वेळ लागतोच. लक्षात ठेवा, त्वचेवर केस असण्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. पण त्यावर नैसर्गिक मार्गांनी उपाय करणं, त्वचेचं आरोग्य टिकवणं आणि केमिकल किंवा ट्रेडिंगपासून दूर राहणं ही महत्वाचं असतं.
