दिवाळीचे ३ दिवस म्हणजे नुसती धमाल असते. फराळाचा आस्वाद घेत गप्पांचा फड रंगत जातो. शिवाय सणासुदीच्या दिवसांत जेवणाचा मेन्यूही खास असतो. सगळ्यांच्या गोतावळ्यात आपण किती जास्त खात आहोत, ते ही विसरून जातो. तेलकट, तुपकट, गोड पदार्थ भरपूर खाल्ले जातात. त्यामुळे मग खूप पाणीपाणी होतं. सुस्ती आल्यासारखी होते आणि ऐन सणात आपण सुस्तावलेले, आळसावलेले दिसू लागतो. हे सगळं टाळायचं असेल तर दिवाळीच्या दिवसांत ३ सोप्या गोष्टी आठवणीने करा, असं सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगत आहेत (Diwali 2025). यामुळे तुम्ही एकदम फ्रेश दिसाल. चेहऱ्यावरही छान तेज येईल.(Skin Care Tips By Rujuta Divekar)
दिवाळीच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर सोनेरी चमक येण्यासाठी उपाय
१. पाणी प्या
ऋजुता दिवेकर यांनी याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून यामध्ये त्या सांगतात की तेलकट, तुपकट, गोड पदार्थ खाल्ल्यामुळे सुस्ती, आळस येतो. त्यामुळे बऱ्याचदा शरीर थोडं फुगल्यासारखंही वाटतं. हे टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्यामुळे हा त्रास होणार नाही. शिवाय शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होईल.
२. केळी खा
दिवाळीनिमित्त तुम्ही कुठे फराळाला, जेवायला जाणार असाल तर तिथे जाण्यापुर्वी १ केळी नक्की खा. कारण केळी प्रो बायोटिक म्हणून काम करते. तुम्ही फराळ किंवा जेवणात जे काही जड पदार्थ खाल ते पचविण्यासाठी केळीची निश्चितच मदत होते. त्यामुळे केळी खायला विसरू नका.
३. ताक प्या
भरपेट जेवण झाल्यानंतर खूप जड वाटतं. पण तरीही जेवणानंतर पातळ ताक नक्की प्या. ताकामध्ये थोडी जिरेपावडर, ओवा आणि चिमूटभर हिंग घाला. यामुळे पचनक्रिया चांगली होईल आणि जेवणाचा त्रास होणार नाही.