ashvini bhave going down memory lane when her kids changed her life | गुंता..‘मातृ’भूमीचा

गुंता..‘मातृ’भूमीचा

ठळक मुद्देमुलांबरोबर आईच्याही वाढण्याची खट्टीमिठी अमेरिकन गोष्ट : लेखांक 2

-अश्विनी भावे

नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाचे जे गोडवे आपण बायका गातो, त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त जिकिरीचं काम असतं ते मूल वाढवण्याचं नि त्याला संस्कारक्षम बनवण्याचं !

मूल वाढविण्याच्या प्रवासात सतत आपल्या कानावर उपदेशाचे बोल पडत असतात ‘भारीच लाडावून ठेवलंय मुलांना, ‘उद्धट आहेत नुसती मुलं, मित्र कसले बनता त्यांचे?’,  ‘बाई बाई, इतकी कडक शिस्त घरात, मग बाहेर फ्रिक आउट होणारच मुलं !’, ‘कशाला चिंता करता इतकी, प्रत्येक मूल आपापलं नशीब घेऊनच येतं!’

व्यक्ती तितके उपदेश ! 

अरे पण मुलांचा स्वभाव काय, त्यांच्या तब्येती कशा आहेत? घरची परिस्थिती काय? आई-वडिलांच्या हाताशी किती वेळ आहे? हे सारं विचारात न घेताच आपलं उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा उपदेश कशाला करतात लोक? - पण करतात !
 

बाळाचं गोंडस रूप, इवल्या बोटांची पकड, निर्व्याज हसू याला भुलून मुलांना जन्माला घालतो खरं आपण; पण जन्मभर निभावयाच्या पालकत्वाच्या जबाबदारीविषयी बेखबर असतो आपण !

अमेरिकन पॅरेण्टिंग क्लासमधला माझा शिक्षक म्हणाला होता, ‘मुलांना स्वतंत्र बनवा’. ते मला पालकत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यात उलगडत गेलं !
‘मेनी टाइम्स वी आर टू क्विक टू हॅण्ड किड्स द डिसिजन, द व्हर्डीक्ट !’ फैसलाच सुनावतो आपण मुलांना, मला वाटतं हे आपलं चुकतंच. चार वर्षाच्या मुलीला जर आपण लहान-सहान निर्णय घेण्याची ताकद देऊ केली तरच ती मोठेपणी आत्मविश्वासानं स्वत:चे निर्णय घेऊ शकेल हे लक्षातच घेत नाही आपण.

मुलं अगदी दहावी-बारावीत गेली तरी ब-याच वेळा पालक त्यांना विचारत नाहीत की, तुम्हाला पुढं काय करायचंय? तुम्ही अमुक-अमुक करायचं आहे, असं म्हणत स्वत:च्या इच्छा-आकांक्षा मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात. 
माझं सुदैव हेच की, माझ्या आई-वडिलांनी हे केलं नाही. मला जे आवडलं ते करण्यात त्यांनी कधी आडकाठी केली नाही. 

दोन मुलांना वाढवताना नकळत आपल्या मनाशी त्यांच्या चांगल्या-वाईट गुणांची तुलना होतेच. पण तरीही दोन्ही मुलांना एकसारखी वागणूक देणं, इतरांसमोर त्यांची तुलना न करण्याचा प्रय} मी कसोशीनं करते.

लहानपणीची एक गोष्ट मला आठवते आहे. मी मुळातच बोलघेवडी होते त्यामुळे मी पटकन सर्वांना आवडून जात असे. नाटकात काम करायला लागले त्यानंतर तर माझं शेजारी-पाजारी, नातेवाइकांत जरा कौतुक होत असे. तेव्हा माझ्या भावाला डावलल्यासारखं वाटू नये म्हणून माझी आई निगुतीनं प्रयत्न करायची. कधी कधी ती मलाही विश्वासात घ्यायची.

हे तर मलाही करावं लागतंच; पण मुलांना परदेशात वाढवणं यात एक वेगळंच आव्हान असतं. कारण दोन वेगळ्या संस्कृतीचा समन्वय साधावा लागतो. कुटुंब व्यवस्थेची, संगोपनाची संकल्पना थोडी बदलावीदेखील लागते. पालकांची भूमिका बजावताना ‘आपण कसे वाढलो होतो’ या आपल्याच अनुभवाकडे आपण एखाद्या संदर्भ ग्रंथासारखं  (रेफरन्स बुक) पाहात असतो. पण ‘आमच्या वेळी असं होतं !’ हे वाक्य मी जवळ जवळ मोडीत काढलं आहे. कारण परदेशात मुलांना वाढवताना तिथली सामाजिक रचना, जीवनपद्धती, शैक्षणिक स्तर आणि पीअर-प्रेशर याची सांगड ‘मी’ कोणत्या संस्कारात वाढले याच्याशी कशी घालणार? या दोन भिन्न संस्कृती जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा चकमकी घडतात. पालकांच्या आयुष्यात आणि मुलांच्या भावविश्वातदेखील ! 

विदेशी संस्कृतीत व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतीत फार टोकाच्या कल्पना पहायला मिळतात. आणि आपण (भारतीय संस्कृतीत) दुसरे टोक गाठतो. आपलं मूल स्वतंत्रपणे विचार मांडायला लागल्यावर तर ‘मला अक्कल शिकवतोस’, असं म्हणून त्याचं तोंड गप्प करायचं की,  तो स्पष्ट बोलतोय म्हणून वैचारिक डिबेटचं स्वागत करायचं हे आपल्याच हातात असतं. 
काही वर्षांपूर्वी मुलांच्या शाळेचा एक कार्यक्रम माझ्या घरी झाला. कार्यक्रमानंतर माझ्या (अमेरिकन, भारतीय आणि इतर देशांतल्या) मैत्रिणी मिळून घर जागच्या जागी लावायला मदत करत होत्या. काम आटोक्यात आल्यावर चहाचे कप हातात घेऊन आम्ही गप्पा मारत बसलो. त्यातल्या बर्‍याच जणींना मोठी, वयात येणारी मुलं होती. विषय निघाला तशी त्यातली एक तिच्या टीनएज मुलींचा किस्सा सांगू लागली.. 

‘काल माझी मुलगी पार्टी आणि स्लीप ओव्हरला गेली होती. (स्लीप ओव्हर म्हणजे मुलांनी एकमेकांच्या घरी राहायला जाणं.) तिथून तिनं मला रडवेल्या आवाजात फोन केला. म्हणाली, आम्ही जिच्याकडे जमलोय तिला म्हणजे त्या होस्ट मैत्रिणीला फोन न करता तिच्या वडिलांनी मलाच फोन केला. हे विचारायला की मुली-मुलीच आहात ना? मी हो म्हटलं; पण मी खोट बोलले. त्यांच्या मुलीचा बॉयफ्रेण्ड आणि त्याचे दोन मित्र अगोदरच तिथे होते. मी तिच्या वडिलांना खरं सांगितलं असतं तर माझ्या मैत्रीचा सवाल होता. म्हणून खोटे बोलले; पण आता माझं मन मला खातंय, काय करू मी?’

यावर माझ्या मैत्रिणीनं तिला सांगितलं, हा त्या मुलीचा आणि तिच्या वडिलांच्यातला प्रश्न आहे. त्यांचे ते सोडवतील. तू उगीच गुन्हेगारासारखं वाटून घेऊ नकोस. ‘गो एन्जॉय युवर पार्टी’.
 यावर माझी दुसरी मैत्रीण तिला म्हणाली, ‘तू असं सांगितलंस? मी तर तिला काही तरी कारण सांगून निघून ये म्हणून सांगितलं असतं .’
यावर सॅण्डी तिचा किस्सा सांगू लागली. 
‘परवा माझ्या मुलीच्या मैत्रिणींची पार्टी होती. म्हणून उशिरा रात्री तिला मैत्रिणीच्या घरी सोडलं. पण तिचे आई-वडील घरात नव्हते. साडेअकराला येणार होते. मला ते खटकलं. मी तिथेच गाडीत बसून राहिले. बराच विचार करून मी मुलीला टेक्स्ट केला, ‘मोठं कुणी नसताना तुला इथं सोडणं मला योग्य वाटत नाही. मी गाडीत तुझी वाट पहात आहे.’ घरी पोहोचेपर्यंत माझी मुलगी गाडीत रडत होती.

या तिच्या कथनावर माझी आणिक एक मैत्रीण तिला म्हणाली, ‘इतक्या मैत्रिणींच्या गराड्यातून तू तिला उचलून आणलंस? पण विचार केलास का तुझ्या  मुलीची किती कुचंबणा झाली असेल? सॅण्डी, अगं किती पिअर प्रेशर असतं आपल्या मुलांना? तुझी मुलगी किती गोड आणि विचारी आहे गं, तू तिच्यावर विश्वास टाकायला हवा होतास ! माझं ऐकशील तर उद्या सॉरी म्हण तिला. तुझ्या या निर्णयामागची तुझ्या मनातली भीतीही तिला सांगून टाक!’
आम्ही मैत्रिणींनी हातात चहाचे कप घेऊन मग पुढचा दीड तास मग याच मुद्दय़ावर उलट-सुलट चर्चा  केली. मी त्यांचे अनुभव लक्ष देऊन ऐकत होते. प्रत्येकीची संस्कृती, विचार वेगळे असतीलही; पण त्या प्रत्येकीच्या हृदयात आपल्या मुलांचं हितच होतं हे मला जाणवलं.
विदेशी मातीत पालकत्वाच्या प्रवासात असे सांस्कृतिक संघर्ष अनेकदा येतात. 
प्रश्न पडतात.
कधी उत्तरं सापडतात, तर कधी प्रश्न नव्यानं कळतात.
त्या प्रश्नोत्तरांच्या वाटेतून पालकत्व कसं कळतं, उमगत जातं, त्याविषयी पुढच्या अंकात.

(लेखिका ख्यातनाम अभिनेत्री आहेत.)  

ashvini.bhave19@gmail.com

Web Title: ashvini bhave going down memory lane when her kids changed her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.