Anjana Tai gave an overwhelming fight against superstition to save the lives of malnourished girls! | कुपोषित मुलीचा जीव वाचवण्यासाठी अंजना ताईंनी दिला अंधश्रध्देशी लढा!
कुपोषित मुलीचा जीव वाचवण्यासाठी अंजना ताईंनी दिला अंधश्रध्देशी लढा!

अंजना तिडके

स्थळ : तारफैल केंद्र क्र.167, जि. अकोला


धागेदोरे बांधले की, आजार बरा होतो.. हा खेळ आजच्या विज्ञान युगातही अनेकांच्या घरात दिसून येतो; पण या खेळात काहींचा जीवही जातो. असाच काहीसा प्रसंग तारफैल परिसरातील एका कुपोषित चिमुकलीवर ओढवला होता. मात्र, अंगणवाडीसेविका अंजना तिडके यांनी पालकांच्या विरोधात जाऊन त्या चिमुकलीचा जीव वाचवत अंधर्शद्धा अन् कुपोषणाचा पराजय केला.

अकोल्यातील तारफैल हा तसा झोपडपट्टीचा भाग. बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह मोलमजुरीवरच चालतो. अस्वच्छतेमुळे आरोग्यविषयक विविध समस्याही तेवढय़ाच. मुलांचं पोषण यथातथाच.  0 ते 6 वर्ष वयोगटातली 84 मुलं 167 क्रमांकाच्या अंगणवाडी कार्यक्षेत्रात येतात. या चिमुकल्यांपर्यंत पोषण आहार पोहचवणं हे कर्तव्यच; पण कुपोषणावर मात करणं हेही तेवढंच महत्त्वाचं. कुपोषणासोबतच अंधर्शद्धाही गंभीर प्रश्न आहे. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. एक वर्षाची आरूषी नामक चिमुकली कुपोषित असल्याचं अंजनताईंनी पाहिलं. तिच्या आईबापाला तशी कल्पना दिली. पण कुपोषण वगैरे काही नसतं, धागेदोरे बांधून सर्व ठीक होईल.. असं उत्तर मिळालं. 

आरुषीचे वडील मजुरीवर जाताच अंजनाताईंनी तिचं घर गाठलं अन् आरुषीच्या आईची समजूत कढली. मात्र, आईचाही विरोधच होता. हा विरोध झुगारून त्यांनी आरुषीला ‘एनआरसी’ केंद्रात दाखल केलं. 15 दिवसातच आरुषीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसू लागली अन् पालकांचे डोळे उघडले. कुपोषणासाठी धोगेदोरे नाही, तर योग्यवेळी योग्य उपचारच हवा, हे त्यांना पटलं. सध्या अंगणवाडीमध्ये चार कुपोषित बालकं आहेत. त्यांना या चक्रातून बाहेर काढण्यासाठी अंजनाताईंचा लढा सुरू आहे. त्या म्हणतात, ‘शासनाच्या पोषण आहारातून कुपोषणावर मात करणं एकवेळ सोपं आहे; पण अंधश्रद्धाळू पालक ही मोठी समस्या आहे. त्यामुळे अंधर्शद्धा अन् कुपोषण ही दुहेरी लढाई लढत असताना पालकांकडून मोठा विरोध होतो. त्यासाठी जनजागृतीची खरी गरज आहे. ’

- प्रवीण खेते 
(उपसंपादक, लोकमत : अकोला)


Web Title: Anjana Tai gave an overwhelming fight against superstition to save the lives of malnourished girls!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.