100 satellites and 24 girls | 100 उपग्रह आणि २४ मुली

100 उपग्रह आणि २४ मुली

- अविनाश साबापुरे

उंच आकाशात उडणारा पतंग म्हणजे माणसाच्या आशाआकांक्षांचं प्रतीकच. सध्या मकर संक्रांतीच्या हंगामात मुलांनी अवघं आकाशच पतंगांनी व्यापून टाकलं आहे. शहरातल्या मुलांचा उत्साह शिगेला पोहोचलाय; पण आमच्या खेड्यातल्या मुलींनी पतंग उडविण्यापेक्षा थेट उपग्रह उडविण्याचा चंग बांधलाय.

हो, उपग्रहच! तेही एक नव्हे, तर एकाच वेळी शंभर!

शंभर उपग्रह तयार करून ते एकाच वेळी अंतराळात प्रक्षेपित केले जाणार आहेत. निष्णात शास्त्रज्ञांसाठी आव्हानात्मक असणारी ही कामगिरी दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी करणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी भागात गरीब घरात जन्माला आलेल्या या मुली कसं करणार हे काम?

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची आखणी झाली आहे. ‘डॉ. अब्दुल कलाम आझाद स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज-२०२१’ ही ती मोहीम. आजवर जगात कुठेही शंभर उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्यात आले नाहीत; पण पहिल्यांदाच ही कामगिरी भारतात होणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी घडणारा हा प्रकार जागतिक विक्रम म्हणून नोंदविला जाण्याची शक्यता आहे. सायन्टिफिक हेलियम बलूनद्वारे उपग्रहांचं प्रक्षेपण केल्यानंतर हे उपग्रह पृथ्वीपासून ३८ हजार मीटरवर स्थापित केले जाणार आहेत. त्यानंतर अंतराळातून पृथ्वीवर स्थापित केलेल्या केंद्राशी कशा प्रकारे संपर्क होतो, अंतराळातील ओझोनचा थर, कार्बन डाय ऑक्साइड, आदी बाबींचा सूक्ष्म अभ्यास या विद्यार्थिनी करणार आहेत. त्यांची नोंद घेण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचा चमू उपस्थित राहणार आहे.

या उपक्रमात लहान आकाराचे उपग्रह तयार करून घेणं आणि ते प्रक्षेपित करणं या कामासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय फाउंडेशननं घेतला. देशभरातील शाळांमध्ये याची सूचना फिरविण्यात आली अन् तब्बल एक हजार विद्यार्थी निवडले गेले. त्यात महाराष्ट्रातील १०० विद्यार्थ्यांचा समावेश असून, एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील ३० विद्यार्थी यात पात्र ठरले. एकाच जिल्ह्यातून एवढे विद्यार्थी पात्र ठरण्याचा मान यवतमाळने पटकावला. त्यातही पाटणबोरीसारख्या दुर्लक्षित दुर्गम गावातील रेड्डीज कॉन्व्हेण्टनं ही कामगिरी बजावलीय.

उपग्रह उडविण्याच्या या मोहिमेत पाटणबोरीतून २४ मुलींची निवड झाली. या मुली आदिवासी, अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातल्या आहेत. घरी अतोनात गरिबी. काबाडकष्ट करणं आणि कसंबसं जगणं हेच त्यांचं वास्तव. त्यामुळेच कसंबसं शिक्षण घेत या मुली शेतात राबत-राबत मोठ्या झाल्या. घाटंजी, पांढरकवडा, जांब, उंदरणी, ताडउमरी, वाई, मोरवा, खैरगाव, कारेगाव बंडल, अर्ली, टिटवी, आदी ठिकाणच्या या मुली आश्रमशाळांमध्ये शिकल्या. नंतर पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना ‘नामांकित इंग्रजी शाळा’ योजनेत स्थान मिळालं आणि त्या पाटणबोरीच्या रेड्डीज कॉन्व्हेंटमध्ये दहावीला शिकायला आल्या. तेथे शिकत असताना विविध स्पर्धांमध्ये भाग घेत या मुलींचा आत्मविश्वास वाढला. शाळेचे अध्यक्ष सुरेश रेड्डी कॅतमवार यांनी इस्रोसारख्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या निबंध स्पर्धेत या मुलींना मागील वर्षी सहभागी केले होते, तर यंदा अब्दुल कलाम फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती मिळताच त्यांनी शाळेतील मुलींना माहिती दिली, त्यांची चाचणी घेतली. त्यातून २४ मुली अन् चार मुलांची नावं फाउंडेशनला दिली. विशेष म्हणजे, फाउंडेशननेही या मागास भागातील तीसही जणांवर विश्वास ठेवून त्यांना संधी दिली. आता त्यांना चेन्नई येथे उपग्रह निर्मितीचं प्रशिक्षणही दिलं. १८ ते २२ जानेवारीदरम्यान नागपूर, चेन्नई आणि पुणे येथे उपग्रहांची प्रत्यक्ष जुळवणी व कोडिंग केले जाणार आहे अन् ७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांच्या निर्धाराचं इंधन घेऊन १०० उपग्रह आकाशात झेपावणार आहेत!

 

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

lokytl@rediffmail.com

 

---------------------------------------------------------------------------

 

 

मुली काय म्हणतात....

 

- शाळेच्या अनेक स्पर्धांमध्ये मी खूप प्रमाणपत्रं मिळविली. आईबाबांना हे प्रमाणपत्र पाहून प्रचंड आनंद होतो. त्यांचा आनंद मला प्रेरणा देतो. आता पेलोड क्यूब चॅलेंजचं प्रमाणपत्र तर मला पाहिजेच.

- प्रियंका आत्राम

 

- एपीजे अब्दुल कलाम हे माझं प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या फाउंडेशनचा उपक्रम माझ्या अभ्यासक्रमातील ‘स्पेस टेक्नॉलॉजी’शी संबंधित आहे. त्यात मी यश मिळविणारच.

- निकिता घोडाम

- राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराला अवकाशातून भारत कसा दिसतो, हा प्रश्न विचारला गेला होता. तेव्हा ते म्हणाले होते, सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा. मलाही अवकाशातून भारत पाहायचा आहे. पण सध्या शंभर सॅटेलाईट सोडून मी सुरुवात करतेय.

- सानिया कनाके

- मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात पोखरण येथे झालेल्या अणुबॉम्ब परीक्षणाबाबतचा सिनेमा मी पाहिलेला आहे. असे प्रकल्प करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आहे. आता मलाही तो आनंद मिळवायचा आहे.

- पूनम नैताम

 

- कल्पना चवाला, सुनीता विल्यमस् यांच्याप्रमाणे मलाही अंतराळवीर बनण्याचं स्वप्न आहे. मी एका निबंधात माझी ही इच्छा व्यक्त केली; पण आता या मोहिमेमुळे मला संधी मिळते आहे.

- मानसी घोडाम

- नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं शिकायला मला खूप आवडतं. या मोहिमेत थेट जर्मनीतून सोमेश चौधरी यांचे ट्रेनिंग अटेंड करून आनंद वाटला.

- शुभांगी कुलसंगे

- कमी वजनाचे सर्वांत लहान शंभर सॅटेलाईट एकाच वेळी अवकाशात सोडण्याच्या उपक्रमाची सूचना शाळेच्या ऑनलाईन क्लासच्या डॅशबोर्डवर वाचली अन् मी लगेच त्यात सहभागाची इच्छा दर्शवली. मला दहावीत असतानाच सॅटेलाईट बनविण्याचं ट्रेनिंग मिळतंय. आणखी काय हवं?

- वैष्णवी कुमरे

 

- सॅटेलाईट प्रोग्राममध्ये माझा नंबर लागल्याचं कळताच माझ्यापेक्षा माझे आई-वडीलच अधिक खूश झाले. त्यांचा आनंद बघूनच हा प्रोग्राम सक्सेसफुल करण्याची मला प्रेरणा मिळालीय.

- जागृती पेंदोर

 

- मी आजवर अनेक गोष्टी स्वत: बनविल्या. जसे गणपतीची मूर्ती, भाकरी वगैरे. पण आता थेट सॅटेलाईटही बनविणार आहे.

- पूजा पुसनाके

- यापूर्वी मी इस्रोच्या ऑनलाईन निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात कार्बन डाय ऑक्साईड आणि ओझोनबाबत माझे विचार मांडले होते. आता ही उपग्रहांची मोहीमही त्याच विषयावर अभ्यास करणार असल्याने त्यात मी आवर्जून सहभागी झाले.

- गौरी कॅतमवार

 

 

 

 

 

 

(

Web Title: 100 satellites and 24 girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.