"ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा; यावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 04:13 PM2021-12-25T16:13:00+5:302021-12-25T17:17:43+5:30

ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन महाराष्ट्रातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये निर्बंध लादले जात आहेत. त्यात ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन महाराष्ट्रातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाईट कर्फ्यूची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल करतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. याच मुद्द्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

तसेच ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनावर आणावी लागेल, असं देखील राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

परदेशात ओमायक्रोनच्या लाखात रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. ऑमिक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा आहे. या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर रुग्णवाढीनं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीतीही नाकारता येणार नाही, असं मत देखील राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, नाताळ आणि नववर्षामुळे उत्साह व पार्ट्यांचे सर्वत्र वातावरण असले तरी ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या १०८ वर गेल्याने आणि वाढत्या संकटामुळे राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. ते शुक्रवारी मध्यरात्रीपासून लगेच लागू झाले आहेत. त्यानुसार, रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आहे. समारंभासाठी बंदिस्त जागेत क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल. आसनक्षमता निश्चित नसलेल्या ठिकाणी २५ टक्के लोकांना उपस्थित राहता येईल. कार्यक्रम खुल्या जागेत झाल्यास २५ टक्के उपस्थिती चालू शकेल.

कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत. विशेषत: ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावत आहोत. पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.