जपानच्या राजदुतांचा साधेपणा; मुंबईत लोकल प्रवास अन् १०० रुपयांचा शर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 01:21 PM2023-06-02T13:21:45+5:302023-06-02T13:31:41+5:30

मुंबईत आलेला माणूस मुंबईच्या प्रेमात पडतो, मुंबईच्या भव्य-दिव्य इमारती, अथांग समुद्र, लोकलची गर्दी, स्ट्रीट फूडचा खमंग स्वाद आणि खरेदीसाठी लागलेला बाजार

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच मुंबईचं आकर्षण आहे. तर, जगभरातील लोकांनाही मुंबईचं कौतुक वाटतं. देशाची आर्थिक राजधानी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची झगमग मुंबईत पाहायला मिळते.

मुंबई भेटीवर आलेल्या उच्चपदस्थांनाही मुंबईतील अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. आता, भारताला बुलेट ट्रेन देणाऱ्या जपानच्या राजदुतांनाही मुंबई चांगलीच भावल्याचं दिसून आलं.

जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी हे मुंबईत दौऱ्यावर आले असता, त्यांनी चक्क लोकल रेल्वेतून प्रवास केला. विशेष म्हणजे लोकल ट्रेनच्या गेटवर उभं राहून त्यांनी फोटोही काढला.

सुझुकी यांनी ट्विट करुन मी मुंबईत आहे, असे म्हटलंय. मुंबईतील मार्केटवरही त्यांनी विशेष लक्ष दिल्याचं त्यांच्या एका फोटोतून दिसून येतंय.

सुझुकी यांनी मुंबईतील स्ट्रीट मार्केटवर केवळ १०० रुपयांत मिळणाऱ्या शर्टसाठी विचारणा केल्याचे दिसून येते. यावेळी, तो शर्ट हातात घेत त्यांनी दुकानदाराशी संवाद साधला.

तसेच, आपल्या ट्विटमध्ये हिरोशी यांनी फॉलोवर्संना प्रश्न केला आहे. त्यामध्ये, हा शर्ट खरेदी करावा का अशी विचारणा केली. त्यावर, अनेकांनी जरूर असं उत्तर दिलंय.

हिरोशी सुझुकी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. यावेळी, फडणवीसांनी त्यांचं स्वागत केलं, आम्ही जपान आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंधांना अधिक दृढ करू, असेही फडणवीसांनी यावेळी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सुझुकी यांना पैठणी साडीसारखी वस्तू भेट दिल्याचंही फोटोत दिसून येत आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यात सुझुकी यांनी भारतात अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांची भेट घेतली. तसेच, भारतासोबत क्वाड आणि जी२० परिषदेच्या भविष्यातील सहकार्यवरही चर्चा केली.

दरम्यान, सुझुकी यांनी भारत दौऱ्यातील विविध ठिकाणचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये वाराणसीत बाटी चोखा खातानाचाही फोटो शेअर केला आहे.