शिवसेना कुणाची, अधिकार कुणाला?; शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत 'हे' सहा महत्वाचे ठराव मंजूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 04:14 PM2022-06-25T16:14:55+5:302022-06-25T16:27:05+5:30

शिवसेना पक्ष आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाला सामोरं जात असताना आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्वाचे ठराव मंजुर करण्यात आले. हे ठराव शिवसेनेच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत.

एकनाथ शिंदे गटानं बंड पुकारल्यानंतर शिवसेनेतून तब्बल ३७ आमदार फुटले आहेत. त्यामुळे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. अशा कठीण काळात पक्षाला सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवसेना भवनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली.

एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात असताना शिवसेनेनं आज थेट कार्यकारिणीची बैठक घेऊन अत्यंत महत्वाचे असे ६ ठराव मंजुर करत बंडखोरांना मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आजवर पक्षाच्या प्रगतीसाठी केलेले काम आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेलं उल्लेखनीय काम याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजुर करण्यात आला. या ठरावावर सर्वांना टाळ्या वाजवून आणि उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.

शिवसेना ही बाळासाहेबांची होती, आहे आणि राहील. इतर कुणीही स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरू शकत नाही. तसं केल्यास रितसर तक्रार आणि कारवाई करण्यासाठीची पावलं उचलली जातील असा दुसरा ठराव संमत करण्यात आला.

शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणी पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना देण्यात आला. हा ठराव खासदार संजय राऊत यांनी मांडला

बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.

शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रत्येक महानगरपालिकेवर भगवा फडविण्याच्या निर्धाराचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.