Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?; मोठी घडामोड, राजकारणातही खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 09:12 AM2021-03-14T09:12:36+5:302021-03-14T11:35:21+5:30

NIA कडून मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. (Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze)

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

तसेच सचिन वाझेंच्या अटकेनंतर ठाण्यातून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणात सचिन वाझे यांच्यासह पाच ते सात जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता NIA कडून मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. यासोबतच ठाण्यातील एका राजकीय नेत्याची देखील चौकशी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

यापूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप केला होता. एनआयएच्या चौकशीतही नेमकी हीच माहिती पुढे आल्याचे सांगितले जात आहे.

ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जातेय, त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडाली आहे.

तत्पूर्वी, सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे शनिवारी सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती.

जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज (14 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (4 नोव्हेंबर) करण्यात आला होता.

25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती तेव्हा वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

विशेष म्हणजे सचिन वाझेंनी याआधीच न्यायालयात धाव घेत अंतरिम जामीनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयाने प्रथमदर्शी अर्जदाराविरोधात पुरावे दिसत असल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचं म्हणत हा जामीनाचा अर्ज फेटाळला. यावेळी न्यायालयाने तपास संस्थांचं मत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान शनिवारी सकाळी जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली होती. तसेच शनिवारीच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते.