"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण..."

By मुकेश चव्हाण | Published: January 17, 2021 09:56 AM2021-01-17T09:56:55+5:302021-01-17T14:15:48+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे प्रकरणाचा धुरळा अजून उडतोच आहे. धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या तरुणीचा शनिवारी पोलिसांनी सविस्तर जबाब नोंदवून घेतला. पश्चिम उपनगरातील डी. एन.नगर सहायक पोलीस आयुक्तांकडे हा जबाब घेण्यात आला. आवश्यकता वाटल्यास तिला पुन्हा बोलावण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त जोत्स्ना रासम यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. सुमारे साडेपाच तास तिच्याकडे चौकशी करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी आपला व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध स्थापित केले, त्याबाबत आपण बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, धनंजय मुंडे यांनी दबाव टाकून दिशाभूल केल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितल्याचे समजते.

तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचे राजकीय जीवन धोक्यात आलं होतं, परंतु भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण घडामोडीला उलट कलाटणी मिळाली, कृष्णा हेगडे यांनी तक्रारदार मुलीवर गंभीर आरोप करत २०१० पासून ही महिला सतत माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतेय असं सांगितलं.

कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी रेणू शर्मावर केलेल्या आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात असलेले वातावरण त्यांच्या बाजूने वळलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे.

बलात्काराचा आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वत: राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो मागितला पाहिजे. परंतु, पवारांनी या प्रकरणी घुमजाव केले आहे. पवारांकडून ही भूमिका अपेक्षित नव्हती, असे सांगत मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून (दि. १८) भाजपाच्या महिला आघाडीकडून राज्यभर तहसीलदार कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत याबाबत खुलासा करताना म्हटले की, माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मुंडे यांनी समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत.

या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केले आहे.