Rajya Sabha Election 2022: चाणक्य रिडिफाइन! राज्यसभा विजयानंतर भाजप नेत्यांचा देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 01:07 PM2022-06-11T13:07:55+5:302022-06-11T13:13:22+5:30

Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राज्यसभा निवडणुकीतील स्मार्ट खेळीची स्तुती केली आहे.

तब्बल २४ वर्षानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मोठेच राजकीय नाट्य पाहायला मिळाले. मतदान पार पडल्यानंतर अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. (Rajya Sabha Election 2022)

या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला. भाजपला महाविकास आघाडीची ९ मते मिळवण्यात यश आले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आले. भाजपच्या १०६ मतांशिवाय त्यांना अधिकची १७ मते मिळवण्यात यश आले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही केवळ लढविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविली होती, जय महाराष्ट्र, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभा विजयानंतर अनेक भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्मार्ट खेळीबाबत त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही करण्यात येत आहे. भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केवळ दोन शब्दांत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. चाणक्य रिडिफाइन्ड असे ट्विट राणेंनी भाजपच्या विजयानंतर केले.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत शिवसेनेवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे सरकारवर त्यांचे आमदारही नाराज आहेत हे स्पष्ट झाले. देवेंद्र फडणवीस यांची रणनीती आणि त्यांच्यावर असलेला जनतेचा व आमदारांचा विश्वास यातून हा विजय साकार झाला, असे केशव उपाध्ये यांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सद्सदविवेक बुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा सांगितले आहे की, हे सरकार कधी पडेल याचा मुहूर्त सांगू नये. हे सरकार आपापसातील कलहाने पडेल, असे विजयी उमेदवार अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना नेहमी "अकेला देवेंद्र क्या करेगा" असे म्हणायचे. आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. करेक्ट कार्यक्रम… अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर, असे वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या विजयाचे फक्त आणि फक्त शिल्पकार कोण असतील ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी भाजपची संपूर्ण टीम आहे. आमच्यासाठी निवडणूक खूपच मोठी आहे, ज्या दिवशी मी अर्ज भरला त्यावेळी सुद्धा मी म्हणालो होतो फडणवीस यांनी संख्याबळाची बेरीज असल्याशिवाय तिसरा उमेदवार जाहीर केला नसता, असे विजयी उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी म्हटले आहे.

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या उमेदवारीवरूनही बरेच राजकारण झालेले पाहायला मिळाले. मात्र, राज्यसभा निकालानंतर त्यांनीही एक सूचक ट्विट केले. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा। परि नाहीं दशा साच अंगीं।। तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा। फजित तो खोटा शीघ्र होय।।, असे संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.

संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीला सुरुवात होताना ठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं...! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!, अशी शायरी ट्विट केली होती. याला भाजपने उत्तर देत, कालची सगळी शायरी उताणी पडली, आज नवं बोलबच्चन. काल मिशां पीळ देत होते आता रडारड..., असा खोचक टोला लगावला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले.

एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. भाजपने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गाने माणसे आपलीशी करण्याच्या गोष्टीमुळे त्यांना यश आले आहे.

राज्यसभा निवडणुकाचा निकाल हा धक्का बसणारा नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी जो मतांचा कोटा ठरवला होता त्याची संख्या पाहिली तर तिन्ही पक्षांच्या कोटामध्ये फरक पडलेला नाही. आमच्यातील कोणीही फुटलेले नाही. प्रफुल्ल पटेल यांना एक मत जास्त मिळाले ते एका अपक्ष आमदाराचे होते. त्या अपक्ष आमदाराने मला सांगूनच तसे केले होते, असे शरद पवार म्हणाले.