बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:36 IST2025-08-19T12:29:49+5:302025-08-19T12:36:38+5:30
Raj Thackeray And Uddhav Thackeray Brothers Yuti And Mahayuti In Best Election 2025: कोणाला होणार फायदा अन् कुणाला बसणार मतविभाजनाचा फटका? बेस्टची ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच समजली जाते आहे.

Raj Thackeray And Uddhav Thackeray Brothers Yuti And Mahayuti In Best Election 2025: बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या २०२५-२०३० या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू बेस्ट कामगार सेना व मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपकडून ५ संघटनांचे संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही निवडणूक चर्चेची झाली. यातच महायुतीकडूनही ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी पॅनल देण्यात आले. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, कार्यकर्त्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे म्हटले जात आहे.
उद्धवसेना व मनसे यांचे 'उत्कर्ष पॅनल' रिंगणात आहे. महायुतीकडून भाजप आ. प्रवीण दरेकर व आ. प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची 'समर्थ बेस्ट कामगार संघटना' आणि शिंदेसेनेचे माजी आमदार किरण पावसकर यांची 'राष्ट्रीय कर्मचारी सेना' एकत्र आल्या आहेत. त्यांनी 'सहकार समृद्धी पॅनल'ची निर्मिती केली आहे.
भर पावसाताही कामगारांनी प्रचंड प्रतिसाद दिला व तब्बल ८३ टक्के मतदान झाल्याचे सांगितले जात आहे. ही निवडणूक ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणूकीची रंगीत तालीमच समजली जाते आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर या निवडणूकीला खूप महत्त्व निर्माण झाले आहे. ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले व दोन्हीकडच्या उमेदवारांचे एकच उत्कर्ष पॅनेल या निवडणुकीसाठी उतरवण्यात आले होते.
त्यांना आव्हान देण्यासाठी आमदार प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना यांनीही आपले पॅनल उभे केले होते. निवडणूक प्रचार जसा रंगात आला तशी ही निवडणूक ठाकरे बंधू विरुद्ध प्रसाद लाड अशीच झाली.
आमदार प्रसाद लाड हे या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. शिवसेनेने (ठाकरे)देखील आपली सगळी यंत्रणा, विभागप्रमुख, नगरसेवक कामाला लावले होते. निवडणुकीच्या आधीच संचालक मंडळाला आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्यामुळे आधीच ठाकरे यांचे पॅनल वादात सापडले होते.
या निवडणुकीत प्रसाद लाड यांचे जसे पॅनल होते तसेच माजी नगरसेवक सुनील गणचार्य यांचे भाजप कामगार संघांचेही पॅनल होते आणि कामगार नेते शशांक राव यांचेही पॅनल होते. राव हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे भाजपची मते विभागली जातील अशीही चर्चा आहे. तर ठाकरे बंधुंच्या युतीचा किती फायदा होईल ते यानिमित्ताने समोर येणार आहेच.
अत्यंत कमी सभासद असलेल्या मनसेसाठी ही निवडणूक फायद्याची ठरणार आहे. रखडलेली बेस्ट पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत आहे. निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळाले, तर महापालिका निवडणुकीत त्यांना लाभ मिळविता येईल.
बेस्टच्या निवडणुकीत २१पैकी उद्धवसेना १९, तर मनसे २ जागा लढवणार आहे. त्यातच बेस्टच्या माझगाव येथील कर्मचारी बबिता पवार यांनी शिंदेसेनेतून ठाकरे बंधूंच्या पॅनलमध्ये प्रवेश केला.
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. सत्ताधारी पॅनेलविरोधात उभे ठाकलेल्या आ. प्रसाद लाड यांनी भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याचा दावा केला आहे. तर, बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये घरे आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या हमीची चर्चा आहे. सोसायटीत जुने नेतृत्व टिकवायचे की नवे चेहरे आणायचे, यावरही चर्चा रंगत आहे.
ही निवडणूक राजकारणापेक्षा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असल्याचा दावा केला जात आहे. प्रचारात स्वस्त घरे, रोजगार निर्मिती यांसारखी आश्वासने दिली जात आहेत. पण, या गदारोळात कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला म्हणजे पुरे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.