Mini train Matheran: अभिमानास्पद! माथेरानच्या मिनी ट्रेनचे युनेस्कोसाठी नामांकन; मध्य रेल्वेने केली शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 10:51 AM2021-08-20T10:51:17+5:302021-08-20T10:58:34+5:30

Mini train Matheran: युनेस्को ग्रीस मेलिना मर्कोरी आंतरराष्ट्रीय पारितोषिक २०२१ साठी मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान लाईट रेल्वेची शिफारस केली आहे.

पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी माथेरानची मिनी ट्रेन युनेस्कोच्या यादीत येण्यास सज्ज झाली आहे. युनेस्कोतर्फे सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या श्रेणींसाठी 'युनेस्को ग्रीस मेलिना मर्कोरी आंतरराष्ट्रीय पारितोषिक २०२१' आयोजित करण्यात आले आहे. (Mini train Matheran)

देशाकडून माथेरानचे नामांकन पाठवण्यात आले आहे. यामुळे माथेरानच्या मिनी ट्रेनची 'झुकझुक' आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील ऐकू येणार आहे. मध्य रेल्वेकडून नेरळ-माथेरान लाईट रेल्वेची शिफारस करण्यात आली असून युनेस्कोनेही त्यासंदर्भात काही माहिती मागविली आहे.

जागतिक वारसा स्थळांचे सांस्कृतिक संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी १९९५ पासून हे पारितोषिक प्रदान करण्यास युनेस्कोने सुरुवात केली. देशभरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांबरोबरच विदेशातील पर्यटक माथेरानला येत असतात.

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी व्हिस्टाडोम डबाही (काचेचा पारदर्शक डबा) यात बसवण्यात आला. स्थानिकांनाही या ट्रेनची खूप मदत होते. २४ जून रोजी मध्य रेल्वेने इंडियन नॅशनल कमिशन फॉर कोऑपरेशन विथ युनेस्को यांच्या माध्यमाने मिनी ट्रेनचा अर्ज दाखल केला. ९ ऑगस्ट रोजी माथेरानचे नामांकन मंजूर केल्याचे पत्र युनेस्कोकडून केंद्र सरकारला प्राप्त झाले.

१३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या पर्यावरण आणि गृहव्यवस्थापक विभागाने माथेरान नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार करून अंतिम टप्प्यातील माहिती केंद्र सरकारकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अंतिम फेरीसाठी माथेरानमधील सांस्कृतिक जीवन, जैवविविधता, मिनी ट्रेनमुळे आदिवासी जीवनावर होणारे परिणाम, माथेरान बायोगॅस प्रकल्प, वीज आणि जंगलसंवर्धनाचे धोरण, स्थानिकांचे जीवनमान, स्थानिक परंपरा आणि उत्सवांबाबत माहिती मागवण्यात आली आहे.

नेरळ ते माथेरान या मार्गावरील माथेरानच्या मिनी ट्रेनची परिचालन आणि देखभाल मध्य रेल्वेकडून करण्यात येते. सध्या अमन लॉज ते माथेरान या दरम्यान मिनी ट्रेन धावत आहे. वाहनविरहित पर्यटन स्थळ आणि बायोगॅस प्रकल्पांसह आवश्यक सर्व माहिती नगरपरिषदेने मध्य रेल्वेकडे सुपूर्द केली आहे.

पुरस्कारासाठी आवश्यक सर्व माहिती रेल्वे प्रशासनाला पुरवण्यात आली आहे. युनेस्को आंतरराष्ट्रीय पुरस्कार नामांकनामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे ही प्रत्येक माथेरानवासीयांसाठी गौरवाची बाब असल्याचे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले.

यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ‘नेरळ-माथेरान लाईट रेल्वे’ या विभागासाठी सांस्कृतिक श्रेणीमध्ये ‘ग्रीस मेलिना मकौरी’ या युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय बक्षिसासाठी निवेदन केले आहे, असे त्यांनी सांगितले.

दर दोन वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी दोन फेऱ्या असतात. पहिल्या फेरीत माथेरान विजयी झाले आहे. अंतिम फेरीतील निकाल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. माथेरानची मिनी ट्रेन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणे ही मोठी बाब असून, मिनी ट्रेनचे जतन, संरक्षण करण्यासाठी मध्य रेल्वे नेहमी तत्पर आहे, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल म्हणाले.

माथेरान ट्रेनची उभारणी १९०१ मध्ये येथील उद्योगपती सर आदमजी पिरभाय यानी स्वखर्चाने केली होती. सन १९०७ मध्ये या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आणि मिनी ट्रेन सुरू झाली. एवढी वर्ष उलटूनही मिनी ट्रेन आजही धावत असून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही बदल केले जातात.

ही मिनी ट्रेन २००२ च्या दरम्यान युनेस्कोच्या ऐतिहासिक दर्जासाठी नामनिर्देशित करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ते मागे पडले.