बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपाकडे; ऑपरेशन लोटस तर नाही?, या ३ गोष्टींमुळे वाढतोय संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 13:25 IST2022-06-24T13:18:24+5:302022-06-24T13:25:46+5:30
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात शिंदे गटाकडून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात शिंदे गटाकडून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे. तसंच सत्ता स्थापनेचाही दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे.
शिवसेनेमधील बंडाळीमुळे महाराष्ट्र सरकारवरच संकट आले असून, महाराष्ट्रातदेखील ‘ऑपरेशन लोटस’चा पुढचा अध्याय दिसणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पडद्यामागे अनेक गोष्टी घडत असताना सार्वजनिकरीत्या मात्र भाजप नेत्यांनी यासंदर्भात ‘वेट अँड वॉच’ची भूमिकाच घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र पुढील ५ गोष्टींमुळे महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' सुरु असल्याचा संशय वाढत चालला आहे.
भाजपाने कर्नाटक, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये अॅक्टिव्हली विरोधी पक्षांचे आमदार फोडून त्यांना आपल्याकडे घेऊन भाजपाच्या तिकिटावर पुन्हा निवडून आणतं सरकार स्थापन केल. भाजपातर्फे खेळल्या गेलेल्या या राजकीय खेळीला मीडियाने ऑपरेशन लोटस म्हटलं.
१. संजय कुटे एकनाथ शिंदेंसोबत-
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे काही आमदार पहिल्यांदा मुंबईहून सूरतकडे रवाना झाले, तेव्हा भाजपाचे नेते संजय कुटे त्यांच्यासोबत सूरतमधील हॉटेलमध्ये असल्याचे दिसून आले. तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील संजय कुटे आमच्यासोबत हॉटेलमध्ये असल्याचं कबूल केलं होतं. संजय कुटे हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
२. भाजपाचे नेते मोहित कंबोज विमानतळावर-
एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत भाजपाचे मुंबईतील नेते मोहित कंबोज सूरत विमानतळावर दिसून आले. मोहित कंबोज विमानतळावर शिवसेना आमदारांच्या विमानांची सोय पाहत होते, असं सांगण्यात येत आहे. शिवसेनेचा हा अंतर्गत वाद असताना मोहित कंबोज तिकडे काय करतायं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
३. भाजपाशासित राज्यांत तळ-
शिवसेनेचे बंडखोर आमदार जर केवळ आपल्या नेत्यावर नाराज असते, तर ते नाराजी व्यक्त करण्यासाठी फोन बंद करून महाराष्ट्रात कुठेही बसू शकले असते. मात्र त्यांनी भाजपाची सत्ता असणाऱ्या गुजरातमधील सूरत आणि आसाममधील गुवाहाटी राज्यात राहणं पसंत केलं. शिवसेनेच्या आमदारांची अंतर्गत नाराजी असती, तर हे मराठी आमदार हजार मैल दूरच्या गुवाहाटीत कशाला जातील? भाजपाच्या मदतीशिवाय हे सारं शक्य झालं असतं, असं वाटत नाही.