HBD Rajkumar : अन् मुंबईत PSI असलेला तरुण बनला 'सुपरस्टार राजकुमार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 10:50 AM2021-10-08T10:50:06+5:302021-10-08T18:37:51+5:30

पोलीस उपनिरीक्षकाच्या पदाचा राजिनामा दिला आणि सिनेमाचे शूटिंग सुरु केले अन् त्यांच्यातील शब्दफेकाची जादू पडद्यावरही झळकली. मुंबईचा फौजदार सुपरस्टार राजकुमार बनला.

जानी... हा शब्द ऐकताच आजही एकच चेहरा डोळ्यांपुढे येतो... तो म्हणजे राजकुमार (Raaj Kumar) यांचा. सुटाबुटात आणि मोठ्या रुबाबात हातातला पाईप सावरत पडद्यावर त्यांची एन्ट्री व्हायची.

त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडायच्या. टाळ्या आणि शिट्ट्यांनी अख्खं थिएटर दणाणून जायचं. आज राजकुमार आपल्यात नाहीत.

आज त्यांचा जन्मदिवस, त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1926 रोजी तर मृत्यू 3 जुलै 1996 रोजी झाला होता. त्यांचा अभिनय आणि डायलॉग डिलिव्हरी जेवढी भन्नाट होती, तेवढेच त्यांच्या आयुष्यातील किस्सेसुध्दा.

ते पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातसुद्धा स्पष्टवक्ते होते. त्यांना डायलॉग आवडला नाही तर ते कॅमेऱ्यासमोरच डायलॉग बदलत होते.

अभिनेता बनण्याआधी राजकुमार हे मुंबई पोलिसात पोलिस उपनिरीक्षक म्हणून नोकरी करत होते. राजकुमार मुंबईच्या ज्या ठाण्यात कार्यरत होते.

तिथे नेहमी सिनेजगातील लोकांची ये-जा असायची. एकदा पोलिस स्टेशनमध्ये निर्माता बलदेव दुबे काही कामानिमित्त आले होते. ते राजकुमार यांच्या बोलण्याच्या अंदाजाने प्रभावित झाले

बलदेव दुबे यांनी त्यांच्या 'शाही बाजार' सिनेमात राजकुमार यांना अभिनेता म्हणून काम करण्यासाठी ऑफर केले. राजकुमार यांनी लगेच होकार दिला.

पोलीस उपनिरीक्षकाच्या पदाचा राजिनामा दिला आणि सिनेमाचे शूटिंग सुरु केले अन् त्यांच्यातील शब्दफेकाची जादू पडद्यावरही झळकली. मुंबईचा फौजदार सुपरस्टार राजकुमार बनला.

राजकुमार फटकळ बोलत असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अमिताभ यांनासुध्दा त्यांचे फटकळ बोलणे ऐकावे लागले होते.

एका पार्टीत राजकुमार मेगास्टार अमिताभ बच्चन यांना भेटले. त्यांनी बिग बींच्या विदेशी सुटची प्रशंसा केली. तेव्हा अमिताभ आनंदी होऊन त्या ठिकाणाचा पत्ता सांगायला लागले जिथून त्यांनी सूट खरेदी केला होता.

राजकुमार हे त्यावेळी फटकळपणे बोलले, मला तेथून पडदे शिवायचे आहेत, तेव्हा, अमिताभ यांनी केवळ हसून दाद दिली.