मुंबई कुणाची?; उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी रणनीती; एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 04:34 PM2022-08-13T16:34:32+5:302022-08-13T16:42:33+5:30

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. यंदाची निवडणूक ही उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. विधानसभेत शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार आणि लोकसभेतील १८ पैकी १२ खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिंदे यांच्या बंडाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.

आमचीच खरी शिवसेना असून बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत शिंदे गटाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या २५ वर्षापासून मुंबईत महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातूनच शिवसेनेची आर्थिक घडी सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपासह शिंदे गटही कामाला लागला आहे.

मुंबईतील २२७ वार्डात शिंदे गटाकडून शाखाप्रमुख नेमून विभागावर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भर दिला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला दादर यायला जमेल असं नाही. त्यामुळे प्रत्येक वार्डात शिंदे गटाचे कार्यालय असेल. याच धर्तीवर आज खासदार राहुल शेवाळे यांनी मानखुर्द परिसरात शिंदे गटाची पहिली शाखा उघडली आहे.

शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा फोटो प्रामुख्याने लावण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनरवर फोटो आहेत. दादर, ठाणे येथे शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय उघडण्यात येणार आहे. यासाठी २-३ जागाही पाहण्यात आल्या आहेत. लवकरच त्यातील एका जागेची निश्चिती करून कार्यालय उभारणीचं काम हाती घेण्यात येईल.

शिंदे गटात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हक्काचं ठिकाण असावं म्हणून दादर, ठाण्यात मध्यवर्ती कार्यालय उभारलं जाणार आहे. एकप्रकारे हे कार्यालय प्रति शिवसेनाभवन असेल असं सांगण्यात येत आहे. या कार्यालयात पक्षाचे शिवसैनिक, शाखाप्रमुख, आमदार, खासदार, नगरसेवक येऊ शकतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहजपणे कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतील. त्याठिकाणाहून राज्यभरात पक्षाची ध्येय धोरणं, कार्यक्रम दिले जातील. पक्षाचे पुढचे निर्णय त्या कार्यालयातून होतील अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तर मुंबईतील प्रत्येक वार्डात शाखा उघडण्यात येणार असल्याचं आमदार सदा सरवणकर यांनी म्हटलं.

मुंबईत शिवसेनेचे सध्याच्या घडीला ९० हून अधिक नगरसेवक आहेत. मात्र यातील काही नगरसेवक, माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, यामिनी जाधव आणि खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटात सहभागी झालेत. त्याचसोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या राहिलेल्या माजी नगरसेवक शीतल म्हात्रे यांनीही शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे मुंबईची विशेष जबाबदारी या नेत्यांवर देण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. लोकांच्या संपर्कात राहा, वॉर्डमध्ये फिरा, कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका अशा सूचना उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना दिल्या आहेत. कारण सेनेतील माजी नगरसेवक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुका २ महिन्यांवर आल्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. तिकीट वाटपातील नाराजी आणि शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांना मिळणारी आमिषे यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या खरी शिवसेना कुठली हा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. त्यात धनुष्यबाण चिन्हाबाबत साशंकता कायम आहे.

शिवसेनेत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बंड झाले आहेत. आमदार, खासदार यांच्यासोबत नगरसेवकही शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेत कुणाची किती ताकद आहे ते समजणार आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांचा वरचष्मा नाही परंतु शिंदे यांच्या बंडखोरीत मुंबईतील अनेक आमदार सहभागी झालेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.