मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 09:40 AM2022-10-05T09:40:51+5:302022-10-05T09:48:39+5:30

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे स्वत: जातीनं लक्ष देत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे- कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानावर आज, बुधवारी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गट समर्थक मोठ्या संख्येने बीकेसी मैदानात उतरणार आहेत.

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे स्वत: जातीनं लक्ष देत आहेत.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार केलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री या मेळाव्यात नक्की काय बोलणार, नवीन गौप्यस्फोट करणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बीकेसी मैदानावरील या मेळाव्याला राज्यभरातून शिंदे गटसमर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. यासाठी राज्यभरातील शिंदे समर्थक मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे निघाले आहेत.

मुंबईत येणाऱ्या शिवसैनिकांची सोय कशी असणार आहे, त्यांना रात्रीच्या भोजनाचं आयोजन कसं असणार आहे, यासाठीही काळजी घेतली जात आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी रात्रीच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जातीनं लक्ष देत असून मध्यरात्री ३.३० वाजता त्यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावर जाऊन पाहणी केली. सभाठिकाणी होत असलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला.

मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी ठाणे आणि मुंबईतील कार्यकर्तेही आवर्जुन उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत जागं राहून काम करणारे म्हणून एकनाथ शिंदेंची ओळख आहे. मात्र, बीकेसी मैदानातील या भेटीमुळे त्यांच्या कामाचा दाखलाच त्यांनी दिला आहे.

पदभार स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथील अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.

आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांच्या मतदारसंघातील बहुतेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्रांनी केला. शिंदे गट आणि भाजप सरकारला ७ ऑक्टोबरला १०० दिवस पूर्ण होत असल्याने मेळाव्याबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी खाण्याची खास सोय करण्यात आली आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरमधून फूड पॅकेट्स ऑर्डर करण्यात आली आहेत. शिंदे गटाकडून प्रशांत कॉर्नरला तब्बल अडीच लाख फूड पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यात कचोरी, गुलाबजाम, खाकरा यांच्यासह अन्य पदार्थही असतील.