By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 11:06 IST
1 / 12मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही चुकीचे बोलले नाहीत. महापालिका निवडणुका एकत्रित लढविण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. कुठलीही अघोरी शक्ती मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही. ठाकरे बंधू एकत्र मिळून निवडणूक लढवून मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याणसह अनेक महापालिकांवर सत्ता स्थापन करतील, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.2 / 12परंतु, तत्पूर्वी मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे गट व मनसे युतीत निवडणूक लढणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाकडून कामगार सेना उत्कर्ष पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. असे असले तरी या पॅनलमधील उमेदवारी निवडीवरून शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरल्याचे म्हटले जात आहे. 3 / 12आदित्य ठाकरे यांना अंधारात ठेवून ही उमेदवारी देण्यात आला असल्याचा दावा केला जात आहे. ही निवडणूक जिंकण्याची खात्री ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होते न होते तोच यामध्ये एक नवीनच वळण आले आहे. ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपा महायुतीकडून या निवडणूक रिंगणार उतरली असून, समृद्धी पॅनल उभे केल्याचे समजते.4 / 12प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदे गटाचे माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्र येऊन सहकार समृद्धी पॅनलची निर्मिती केली आहे. त्यामुळे १८ ऑगस्टला होणारी ही पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. 5 / 12या घडामोडी घडत असताना शिंदे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला ठाकरे बंधूंच्या पॅनेलमध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे बंधूंना जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतलेला नसल्याचे चित्र असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले बेस्टचे कामगार या निवडणुकीत फारसा रस घेत नसल्याचीही कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. 6 / 12ही नाराजी शहर भागातील भायखळा, शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्येही दिसू लागली आहे. परळमधील बेस्टच्या वसाहतीत पतपेढीचे सर्वाधिक सभासद असून त्यांनी शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारीला विरोध विरोध केला आहे. परळच्या वसाहतीतील बेस्टच्या कामगारांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती.7 / 12शिवसेना शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटात येण्याबाबत सांगितले होते. माजी आमदार यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय असलेल्या या शिंदे गटातील महिला उमेदवाराने सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे गटातील पक्षप्रवेशाला ठाम नकार दिल्याचे म्हटले जात आहे. या घडामोडींमुळे शिवसेनेतील बेस्टच्या कामगारांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे. 8 / 12दुसरीकडे, या निवडणुकीत २१ पैकी ठाकरे गट १९ जागा, तर मनसे दोन जागा लढवणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची निवडणूक १८ ऑगस्ट रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व आहे. 9 / 12मुंबई महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे तितका काळ बेस्ट उपक्रमातही शिवसेनेची सत्ता होती. बेस्ट कामगार सेनेलाही बेस्ट उपक्रमात चांगले दिवस होते. त्यामुळे कामगारांच्या पतपेढीतही गेली नऊ वर्षे बेस्ट कामगार सेनेचेच पॅनेल होते. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर बेस्टच्या पतपेढीची होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. 10 / 12बेस्टची ही निवडणूक आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी ठरणार असल्याचेही बोलले जात आहे. बेस्टच्या या निवडणुकीतून मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालिमच सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. 11 / 12दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणूक मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन लढेल, अशी अटकळ बांधली जात असतानाच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणुकीत मनसे आणि उद्धवसेनेची युती झाली आहे. 12 / 12बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकारण चांगलेच रंगले असून गेली २० वर्षे बेस्टमध्ये सत्ता असलेल्या उद्धवसेनेला ही निवडणूक जड जाण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला ठाकरे गटाने दिलेल्या उमेदवारीमुळे या निवडणुकीच्या प्रचारापासून ठाकरेंचे शिवसैनिक लांब राहात आहेत. सदस्यांच्या मनातही संभ्रम निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.