मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:39 IST
1 / 15Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. मराठीचा मुद्दा, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस अशा निमित्ताने मागोमाग झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठींनी या चर्चांना आणखी बळ मिळाले. मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट म्हणून बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येत युती करून एक पॅनल उभे केले.2 / 15बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत का होईना ठाकरे बंधू एकत्र आले म्हटल्यावर मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला. याचीच पुनरावृत्ती आता मुंबई महापालिकेत होणार, असे दावे केले जाऊ लागले. परंतु, दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निकालाने या सर्व तर्कांना जोरदार तडा दिल्याचे पाहायला मिळाले. 3 / 15बेस्टच्या कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला. मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. मात्र या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला एकही जागा मिळालेले नाही.4 / 15२१ जागांच्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी १९ तर राज ठाकरे यांनी दोन उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. तर शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक १४ उमेदवार निवडून आले आहेत. तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. गेल्या ९ वर्षापासून उद्धव ठाकरे यांची बेस्ट पतपेढीवर सत्ता होती. आता बेस्टच्या पतपेढीवर शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनची सत्ता आली आहे. 5 / 15मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र आल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधू पराभूत झाले आहेत. १८ ऑगस्ट २०२५ रोजी ही निवडणूक झाली होती. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही निवडणूक चर्चेची ठरली. ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीने एकात्मक पॅनल उभे केले होते. ही निवडणूक ठाकरे बंधू आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनली होती. 6 / 15उद्धवसेना व मनसे यांचे 'उत्कर्ष पॅनल' रिंगणात होते. तर, महायुतीकडून भाजपा प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची 'समर्थ बेस्ट कामगार संघटना' आणि शिंदेसेनेचे माजी आमदार किरण पावसकर यांची 'राष्ट्रीय कर्मचारी सेना' एकत्र आल्या आहेत. त्यांनी 'सहकार समृद्धी पॅनल'ची निर्मिती केली होती. या निवडणुकीत प्रसाद लाड यांचे जसे पॅनल होते तसेच माजी नगरसेवक सुनील गणचार्य यांचे भाजप कामगार संघांचेही पॅनल होते आणि कामगार नेते शशांक राव यांचेही पॅनल होते. 7 / 15भर पावसाताही कामगारांनी प्रचंड प्रतिसाद दिला व तब्बल ८३ टक्के मतदान झाले. बेस्ट उपक्रमाची सर्व आगरे आणि बेस्टची कार्यालये अशा ३५ केंद्रावर ही निवडणूक पार पडली. पतपेढीच्या १५,१२३ सभासदांपैकी १२,६५६ सभासदांनी मतदान केले. मंगळवारी वडाळा आगारात सकाळी ९ वाजता मतमोजणी होणार होती. मात्र पावसामुळे मतमोजणी करणारे अधिकारी वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात दुपारी २ वाजल्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. एकूण ३५ केंद्र आणि दीडशे उमेदवार असल्यामुळे मतपत्रिकांवरच्या या मतमोजणीला खूप विलंब झाला. निवडणुकीचा निकाल पहाटे जाहीर झाला.8 / 15या निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एक मध्ये ट्विस्ट आला. सुरुवातीला सहकार समृद्धी पॅनेलला नऊ जागांवर विजय मिळाला होता. मध्यरात्री पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर शशांक राव पॅनेलच्या आणखी दोन उमेदवारांचा विजय झाला. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चिंता वाढल्या आहेत.9 / 15ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता न आल्याने शिवसेना आणि मनसेची चिंता वाढली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध आमदार प्रसाद लाड अशी प्रमुख लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. 10 / 15निकालापूर्वी प्रसाद लाड आणि ठाकरे बंधूंच्या गटांनी आपलाच विजय झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला होता. परंतु, या निवडणुकीत फारशा चर्चेत नसलेले शशांक राव पॅनेलने कमाल करून दाखवली. कोणताही गाजवाजा न करता शशांक राव यांच्या पॅनलने तब्बल १४ जागांवर विजय मिळवला. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला ७ जागा मिळाल्या.11 / 15शशांक राव यांच्या पॅनेलच्या विजयात गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनांसोबत काम करण्याचा अनुभव, आंदोलने आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे घटक महत्त्वाचे ठरले. या सगळ्यामुळे बेस्ट पतपेढीच्या तब्बल १५ हजार मतदारांनी ठाकरे बंधू आणि महायुती दोघांनाही नाकारत शशांक राव पॅनेलच्या पारड्यात दान टाकल्याची चर्चा आहे. 12 / 15सहकार समृद्धी पॅनेलच्या ७ विजयी उमेदवारांमध्ये भाजपाच्या प्रसाद लाड गटाचे ४, शिवसेना शिंदे गटाचे किरण पावसकर गटाचे २ आणि ओबीसी वेल्फेअर युनियनचा एक उमेदवार विजयी ठरला. ठाकरे गटाने आपली सगळी यंत्रणा, विभागप्रमुख, नगरसेवक कामाला लावले होते. आमदार प्रसाद लाड हे या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते.13 / 15निवडणूक प्रचार रंगात आला तशी ही निवडणूक ठाकरे बंधू विरुद्ध प्रसाद लाड अशीच झाली. शशांक राव यांच्या पॅनलने सगळा डाव उलटवत तब्बल १४ जागांवर विजय प्राप्त केला. ही निवडणूक राजकारणापेक्षा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असल्याचा दावा केला जात होता. प्रचारात स्वस्त घरे, रोजगार निर्मिती यांसारखी आश्वासने दिली जात आहेत. पण, या गदारोळात कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला म्हणजे पुरे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.14 / 15प्रसाद लाड यांनी सोशल मिडिया पोस्टवरुन ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. जागा दाखवली म्हणत प्रसाद लाड यांनी ही पोस्ट केली आहे. “बेस्ट इलेक्शन मध्ये ‘ठाकरे ब्रँड’ २१ समोर ००० ००/२१ म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत”, असे प्रसाद लाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.15 / 15एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल?… या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे!!, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.