शीतल म्हात्रे व्हिडिओ मॉर्फप्रकरणी आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय ताब्यात; कोण आहे 'तो'?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 03:35 PM2023-03-13T15:35:06+5:302023-03-13T15:40:14+5:30

६ महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह पक्षातच राहून वेगळा पवित्रा घेतला. शिंदे यांच्या बंडाला विधानसभेच्या ५५ पैकी ४० आमदारांनी साथ दिली.

शिवसेनेतील या फुटीचे संघर्ष स्थानिक पातळीपर्यंत पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी शिंदे-ठाकरे पदाधिकारी आमनेसामने आले. केंद्रीय निवडणूक आयोगापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत या दोन्ही गटाची लढाई सुरू होती.

त्यात शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाले. याच शिंदेंना साथ देणाऱ्या मुंबईतील प्रमुख पदाधिकारी शीतल म्हात्रेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. म्हात्रेंनी या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओचे पडसाद थेट राज्याच्या विधानसभेत उमटले. जाणुनबुजून एका महिलेला बदनाम करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ मॉर्फ करून फिरवल्याचा आरोप करण्यात आला. यामागे मास्टरमाईंड कोण हे शोधा अशी मागणी शिवसेना-भाजपाच्या महिला आमदारांनी केली.

त्यात या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले साईनाथ दुर्गे यांना अटक केली. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरेंच्या युवासेनेतील प्रमुख चेहरा. साईनाथ हे मुंबई सिनेटचे सदस्य होते. त्याचसोबत युवासेना कार्यकारणी सदस्यपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

कोण आहे साईनाथ दुर्गे? - एकेकाळी मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष असलेले साईनाथ दुर्गे यांनी २०१५ मध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरेंच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन युवासेनेत प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलं होते.

नेमकं काय आहे प्रकरण? - शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी सत्ताधारी भाजपा-शिवसेना नेते आक्रमक झाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडले तेव्हापासून मला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. तरीदेखील आम्ही उत्तर दिले नाही. मात्र आता झालेल्या प्रकाराने स्त्री म्हणून वेदना होत आहेत. ज्या पद्धतीने व्हिडीओ काढून त्यावर गाणे टाकून तो मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला असा आरोप शीतल म्हात्रेंनी केला.

त्याचसोबत ठाकरे गटाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या पेजेसवर तो व्हायरल करण्यात आला. ठाकरे गटाकडूनच हा व्हिडीओ व्हायरल करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. त्यानंतर सोमवारी हा मुद्दा विधानसभेत महिला आमदारांनी उचलून धरला.