आऊटगोईंगमुळे मनसेत अस्वस्थता; राज ठाकरेंच्या मदतीला धावला 'हा' मराठी अभिनेता

By मुकेश चव्हाण | Published: February 2, 2021 07:01 PM2021-02-02T19:01:30+5:302021-02-02T19:11:18+5:30

आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सोमवारी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज पुन्हा मनसेला आणखी एक धक्का बसला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते मंदार हळबे यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यी उपस्थितीत मंदार हळबे यांनी भाजापत प्रवेश केला. मंदार हळबे यांनी भाजपात प्रवेश केल्यानं कल्याण- डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. याचदरम्यान अभिनेते संजय मोने यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

संजय मोने यांनी मनसेबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संजय मोने म्हणातात की, ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे, त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुस-या पक्षात प्रवेश केला की लगेच "मोठी बातमी"असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते. याचा अर्थ त्या पक्षाच्या "असण्याची"सगळे जण दखल घेतात..हो ना? याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा, असं संजय मोने यांनी म्हटलं आहे.

संजय मोने पुढे म्हणाले की, या मधल्या "lock down"च्या काळात सत्ता हाताशी नसतांना ज्यांनी तुम्हाला मदत (साहाय्य खरं तर) केली ,ते जरा लक्षात ठेवा. माझ्या मतदार संघात, जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले, त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हटलं की उगाच जबाबदारी येते. तर थोडा शब्दप्रयोग बदलतो, तर आपला हक्क आहे, समजा, असं मत संजय मोने यांनी व्यक्त केलं आहे.

तळटीप-मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाहीये.फक्त परिस्थिती आणि अवस्था काय होती ते सांगतोय..इतर अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आणि अवस्था होती..शेवटी आपण ठरवायचं आहे..जाणता राजा (जो जाणतो)आणि नेणता राजा (जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी -इप्सित स्थळी सुरक्षित नेतो )यात निवड करायची आहे..बोटाला रंग लागला की मतदान असं समजू नका. रंग लावायला बोट शिल्लक राहिलंय हे महत्वाचं, असं संजय मोने यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे.

तत्पूर्वी, राजेश कदम, मंदार हळबे या सारख्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे, हा मनसेसाठी एक मोठा धक्का मानला आहे. कारण कल्याण-डोंबिवलीत मनसेचा विस्तार आणि जनाधार वाढवण्यात या दोन्ही नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विश्वासातील नेते म्हणूनही राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी ओळख होती.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कृष्णकुंजवर धाव घेत आज राज ठाकरे यांच्याशी जवळपास 35 मिनिटं चर्चा केली. राजेश कदम आणि मंदार हळबेंच्या पक्षांतरानंतर मनसेला डोंबिवलीत पडलेल्या खिंडारामुळे कृष्णकुंजवर व्यूहरचनेला सुरुवात झाली. मार्च महिन्यात कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.

दरम्यान, खेड तालुक्यातील मेटे गावातील (पाटील वाडी) मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शाखा अध्यक्ष सह शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश केला आहे.