गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 07:11 IST2025-08-11T07:11:23+5:302025-08-11T07:11:32+5:30
उपोषणाचाही दिला इशारा

गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
मुंबई :मुंबईउच्च न्यायालयाने कबुतरखान्यांच्या परिसरात कबुतरांना खाद्य टाकण्यावरील बंदी कायम ठेवल्यानंतरही काही जैन बांधवांनी दादर कबुतरखान्याजवळ दाणे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना थांबविले. या कारवाईनंतर १३ ऑगस्टपासून कबुतरखाना बंदीविरोधात उपोषण सुरू करण्याचा इशारा जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी दिला. यामध्ये सर्व समाज सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र गोरक्ष, गोसंरक्षण ट्रस्टचे जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी रविवारी दादर कबुतरखाना येथे येऊन तीव्र भावना व्यक्त केल्या. 'जैन समाज शांतताप्रिय आहे. आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाच्या मार्गाने लढू. मात्र धर्माच्या रक्षणासाठी गरज भासल्यास शस्त्र उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले. संविधान, न्यायालय आणि सरकारचा मान राखतो असे सांगून धर्मासाठी शस्त्र हातात घेण्याची तयारी असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
न्यायालयीन लढ्यासाठी चार वकील
कबुतरे मरू नयेत यासाठी समाज कटिबद्ध आहे. पर्युषण पर्व संपल्यानंतर मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात येईल. समाजाच्या वतीने न्यायालयीन लढा लढण्यासाठी चार वकिलांची नियुक्ती केली आहे. न्याय नाही मिळाला तर देशभरातील जैन बांधव शांतीपूर्ण उपोषणासाठी मुंबईत येतील, असे जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी सांगितले.
मांसाहारामुळे होणाऱ्या मृत्यूंची तुलना करून, कबुतरांवरील बंदीला त्यांनी अन्यायकारक ठरविले. कबुतरांना दाणे टाकू नयेत, असा फलक दादर कबुतरखान्याजवळील मंदिर ट्रस्टच्या नावाने लावला असला तरी तो जैन मंदिर ट्रस्टने लावला नसल्याचे त्यांनी सांगितले.