मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:36 IST2025-11-20T15:31:31+5:302025-11-20T15:36:29+5:30
मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल. त्यात भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि रामदास आठवलेंच्या आरपीआयसोबत मित्रपक्ष एकत्रित राहू असं आशिष शेलारांनी सांगितले.

मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात ठाकरे बंधूंकडे सत्ता आल्यास कुणीतरी खान मुंबईचा महापौर होईल असं विधान भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केले होते. साटम यांच्या विधानावरून जोरदार वाद झाला. त्यानंतर मुंबईचा महापौर मराठी माणूसच होईल असा पलटवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आला. त्यात आता भाजपा नेते आशिष शेलार यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का या प्रश्नावर शेलारांनी दिलेले उत्तर सगळ्यांना हैराण करणारे आहे.
या मुलाखतीत लोकांनी भाजपा महायुतीला मतदान केले तर मराठी माणूस मुंबईचा महापौर करेल हे खात्रीने सांगू शकते का असा प्रश्न विचारला. त्यावर शेलार म्हणाले की, बिल्कुल मुंबईचा महापौर हिंदू होणारच, भाजपाचा महापौर हिंदू असेल त्यावर पत्रकाराने मराठी माणूस होईल का असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा मराठी आणि हिंदू वेगळा आहे का असा प्रतिप्रश्न शेलारांनी विचारला. परप्रांतीय भूमिकेला आम्ही मान्यता देत नाही. मुंबई मराठी माणसाची आहे आणि मुंबईत काम करणारा मुंबईकर आहे. त्यामुळे हिंदू महापौर बनेल असं सांगत त्यांनी मराठी माणूस हा उल्लेख टाळण्याचा प्रयत्न केला. बोल भिडू या चॅनेलने आशिष शेलारांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे.
तसेच मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल. त्यात भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि रामदास आठवलेंच्या आरपीआयसोबत मित्रपक्ष एकत्रित राहू. ज्यापद्धतीचे आरोप अजित पवारांच्या पक्षाचं मुंबईतील नेतृत्व असलेले नवाब मलिक यांच्यासोबत युती करणे शक्य नाही. आम्ही स्वबळावर किती जागा जिंकू शकतो ते आमच्या कार्यकर्त्यांनी २०१७ च्या निवडणुकीत दाखवले. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी मिळून जे आम्ही नियोजन केले, त्याचे यश आमच्या पारड्यात पडले. त्यामुळे आमच्या बळावर कुणी कळ काढण्याचं काम करू नये असा टोला आशिष शेलारांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, जागावाटपावर अधिकृत चर्चा झाली नाही. मुंबई महापालिकेबाबत अजून काही निर्णय झाला नाही. आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे हे कार्यकर्त्यांना वाटते. जेव्हा युतीची बोलणी होतील तेव्हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, रामदास आठवले, आमचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी म्हणून मी एकत्रित बसून निर्णय घेऊ. सध्याच्या घडीला मुंबईत महायुतीचा महापौर बसवण्याचा आमचा मानस आहे. मुंबईकर हा ब्रँड आहे. मुंबई महापालिकेत उबाठा-मनसे वेगवेगळे लढून अर्ध्या जागांचे डिपॉझिटही वाचवू शकणार नाहीत. माझं उद्धव ठाकरेंना खुले आव्हान आहे तुम्ही वेगळे लढून दाखवा. त्यामुळे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते दोघे एकत्र येतायेत. वेगळे लढले तर ठाकरे बंधूंची दमछाक होईल अशी टीकाही आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर केली आहे.