लाखभर विद्यार्थी नेमके गेले तरी कुठे? २ वर्षांपासून पहिली ते दहावीपर्यंतच्या पटसंख्येत कमालीची घसरण; शिक्षकांसह तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:41 IST2025-10-12T11:40:48+5:302025-10-12T11:41:10+5:30
यू-डायस आकडेवारीनुसार, उपसंचालक अंतर्गत २०२३-२४ मध्ये १,७३१ शाळांमध्ये एकूण ११,२८,१६२ विद्यार्थी होते. २०२४-२५ मध्ये शाळांची संख्या वाढून १७४२ झाली, मात्र विद्यार्थ्यांची संख्या २८,०४९ ने घटून ११,००,८१३ इतकी राहिली....

लाखभर विद्यार्थी नेमके गेले तरी कुठे? २ वर्षांपासून पहिली ते दहावीपर्यंतच्या पटसंख्येत कमालीची घसरण; शिक्षकांसह तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
घन:श्याम सोनार -
मुंबई : मागील दोन वर्षांत मुंबईतील पहिली ते दहावीपर्यंतच्या उपसंचालका अंतर्गत ७४ हजार ९६६ आणि पालिकेतील ४१ हजार ४१० विद्यार्थी असे एकूण १ लाख १६ हजार विद्यार्थ्यांची संख्या घटल्याची माहिती यू-डायसच्या आकडेवारीतून समोर आली. यामुळे शिक्षक व तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली.
यू-डायस आकडेवारीनुसार, उपसंचालक अंतर्गत २०२३-२४ मध्ये १,७३१ शाळांमध्ये एकूण ११,२८,१६२ विद्यार्थी होते. २०२४-२५ मध्ये शाळांची संख्या वाढून १७४२ झाली, मात्र विद्यार्थ्यांची संख्या २८,०४९ ने घटून ११,००,८१३ इतकी राहिली. २०२५-२६ मध्ये सप्टेंबरपर्यंत माहितीनुसार ११ नवीन शाळा वाढून एकूण शाळा १,७५२ झाल्या. पण विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन १,०५,३९६ इतकी झाली. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांमध्ये ४६,९१७ इतकी घट झाली आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल आहे, तसेच गेल्या सात-आठ वर्षांत जन्मदर घटल्याचाही परिणाम दिसतो.
संजय जावीर, शिक्षण निरीक्षक, मुंबई
पालिकेने सीबीएसई इंग्रजी
शाळा सुरू केल्या. मराठीच्या शाळा बंद पडल्या. ती मुले देखील इंग्रजीकडे गेली. जबाबदार पालिका आहे.
विजय पाटील, चिटणीस, राष्ट्रीय कर्मचारी सेना
पटसंख्या कमी होत असेल तर चिंताजनक आहे. पण त्याला अनेक पैलू आहेत. तपशीलवार वार्डनिहाय आकडेवारी प्राप्त करून त्या आधारेच सविस्तर सांगता येईल.
पद्मजा वेलासकर, माजी प्राध्यापक, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स
या आकडेवारीबाबत प्रत्यक्ष वस्तुस्थिती अधिकाऱ्यांकडून समजावून घ्यावी लागेल. त्यानंतरच याबाबत ठोस काही सांगता येईल.
अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त, शिक्षण, महापालिका
शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळण्यासाठी शासन प्रयत्नशिल असताना पटसंख्येत घसरण हाेत असल्याने चिंता व्यक्त हाेत आहे.
काय सांगते आकडेवारी?
पालिकेच्या २०२३-२४ मध्ये २,३८० शाळांमध्ये ७,३२,५१७ विद्यार्थी होते. २०२४-२५ मध्ये शाळा ३७ ने कमी होऊन २,३४३ एवढ्याच राहिल्या. विद्यार्थ्यांची संख्या २३,७५३ ने घटून ७,०८,७६३ झाली. २०२५-२६ मध्ये शाळा ९ ने वाढून २,३५२ झाल्या. परंतु विद्यार्थ्यांची संख्या १७,६५७ ने कमी होऊन ६,०८,१०६ इतकी राहिली.
जन्मदर घटल्याचा अजब दावा
दोन वर्षांच्या तुलनेत सतत पटसंख्या कमी हाेत आहे. पहिली ते दहावीच्या वर्गांमधील आतापर्यंत ४१ हजार ४१० विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. शिक्षण विभागाने जन्मदर घटल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, ही पटसंख्या कशा प्रकारे पुन्हा वाढवणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.