Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा'; रोहित पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 11:41 IST

दोन दिवसापूर्वी तलाठी परिक्षेचे निकाल समोर आले. यात दोनशेपैकी काही उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे समोर आले.

Rohit Pawar ( Marathi News ) : मुंबई-  दोन दिवसापूर्वी तलाठी परिक्षेचे निकाल समोर आले. यात दोनशेपैकी काही उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे समोर आले. याबाबत विद्यार्थ्यांनी चौकशीची मागणी केली, तर दुसरीकडे संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएच.डी. फेलोशीप) मिळविण्यासाठी बुधवारी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, प्रश्नप्रत्रिका सीलबंद न देता झेरॉक्स कॉपी देण्यात आल्याने विद्यार्थी बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून बाहेर पडले. पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला. यावरुन आता राष्ट्र्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली आहे. 

आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली. 'तलाठी भरतीतील गैरप्रकार ताजा असतानाच काल पुन्हा सारथी, बार्टी आणि महाज्योतीमार्फत पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेचाही पेपर फुटला. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का?, असा सवालही रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये केला. 

प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याचे कबूल केले; मात्र पेपर फुटल्याचे मान्य केले नाही, सेट समन्वयकांना विद्यार्थ्यांचा घेराव 'वारंवार होणाऱ्या पेपरफुटी मुळं प्रामाणिक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत असून त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय. त्यामुळं पेपरफुटी वर कडक कायदा करा अशी मागणी युवांनी आणखी किती वेळा करायची? युवांना सिरीअस होण्याचा सल्ला देत असताना आपल्या जबाबदारीबाबत आपण सिरिअस होणार की नाही?, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला. 

'प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याचे कबूल केले'

संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएच.डी. फेलोशीप) मिळविण्यासाठी बुधवारी (दि. १०) परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, प्रश्नप्रत्रिका सीलबंद न देता झेरॉक्स कॉपी देण्यात आल्याने विद्यार्थी बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून बाहेर पडले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याचे कबूल केले, मात्र, पेपर फुटल्याचे मान्य केले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालत घोषणा दिल्या.

सारथी, बार्टी आणि महाज्योती यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्रता परीक्षा २४ डिसेंबरला घेण्यात आली होती. विद्यापीठाच्या ‘सेट’ विभागावर प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी होती. मात्र, ही प्रश्नपत्रिका ‘सेट-२०१९’च्या प्रश्नपत्रिकेची जशीच्या तशी कॉपी असल्याचे आढळले. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे बुधवारी परीक्षा घेण्यात आली, मात्र पुन्हा प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही.

तलाठी परीक्षा गुणवत्ता यादीत गोंधळ?

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात दाेनशे गुणांचा पेपर असतानाही काही उमदेवारांना चक्क दाेनशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची एसआयटी मार्फत चाैकशी करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत करण्यात आली आहे.

महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती- २०२३ परीक्षेची गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि. ५) प्रसिद्ध केली आहे. तलाठ्यांच्या ४ हजार ४६६ रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले हाेते. छाननीअंती १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज पात्र झाले आणि त्यातील तब्बल ८ लाख ६४ हजार ९३० विद्यार्थ्यांची ५७ सत्रांत परीक्षा पार पडली हाेती.

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ शिंदेअजित पवारदेवेंद्र फडणवीस