Want to maintain ideology or prevent BJP? | महाराष्ट्र निवडणूक 2019: विचारधारा सांभाळायची की भाजपला रोखायचे?
महाराष्ट्र निवडणूक 2019: विचारधारा सांभाळायची की भाजपला रोखायचे?

मुंबई : सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला पेचप्रसंग आणि क्षणाक्षणाला बदलणारी राजकीय समीकरणे यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण झाले आहे. विशेषत: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिराख्यांमध्ये विचारधारा की सत्ता अशा वादाचे फड रंगत आहेत. भाजपला रोखायचे की विचारधारा जपायची, याबाबत निश्चित भूमिका घ्यायची कशी असाच प्रश्न नेत्यांसाबेत कार्यकर्त्यांना पडला आहे.
भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी शिवसेनेसोबत जायला हवे, असा सूर काही दिवसांपासून सुरू होता. भाजप सत्तेत आल्यास मोठ्या प्रमाणावर फोडाफाडी होई्रल. आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होतील त्यात भाजप सत्तेत असल्यास अडचणी येतील, अशी भूमिका मांडली जात होती. शरद पवार यांच्या खेळीमुळे आघाडीला संधी निर्माण झाल्याचाही दावा केला जात होता. विशेषत: आमदारांनी बाहेरून पाठिंबा नको तर सत्तेत सहभागी व्हायला हवे, अशी ठाम भूमिका मांडल्याचे वृत्त होते. मात्र, सोमवारच्या वेगवान राजकीय घडामोडींनी सामान्यांनाच नव्हे तर आघाडीच्या कार्यकर्त्यांनाही कोड्यात टाकले आहे.
भाजपला तर रोखण्यासाठी शिवसेनेला जवळ करा, या आजवरच्या भाषेवर हायकमांडने विचारधारेचा अल्पविराम लावल्याचेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या घडामोडींमुळे आघाडीचे कार्यकर्ते विचारधारेचे काय करायचे, या प्रश्नावर थबकले आहेत. या मुदद्यावरून परस्पर विरोधी दावे आणि तर्क मांडले जात आहेत.
>कार्यकर्त्यांच्या उत्साहाला लागला ब्रेक
नवनिर्वाचित आमदारांच्या मागणीला हायकमांडचा हिरवा कंदील मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा एकत्रित फडकवायलाही सुरूवात केली होती. परंतु, हायकमांडने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत ठोस आणि स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळले. याबाबत राष्ट्रवादीचे अद्यक्ष शरद पवारांशी चर्चा करण्याचा पवित्रा दिल्लीने घेतल्याने कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला चांगलाच ब्रेक लागला.

Web Title: Want to maintain ideology or prevent BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.