Join us  

Video: सुरतसारखी दुर्घटना महाराष्ट्रातही घडू शकते; राष्ट्रवादीकडून तावडेंवर आर्थिक संबंधांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 5:26 PM

मुंबईत ३० ते ३५ हजार कोचिंग क्लासेस आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. या क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाही.

मुंबई - कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो मंत्रालयात धूळखात पडून आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्रीअनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान याकडे शिक्षणमंत्रीविनोद तावडे दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली.

सुरत येथे कोचिंग क्लासेसमध्ये भीषण आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये २० ते २२ लहान मुलांचा मृत्यू झाला.त्यामुळे देशात खळबळ उडाली. महाराष्ट्रात १ लाख १० हजाराच्यावर कोचिंग क्लासेस आहेत. त्यामध्ये मुंबईत ३० ते ३५ हजार कोचिंग क्लासेस आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. या क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाही. कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला. सुरतसारखी घटना महाराष्ट्रात किंवा मुंबईत घडू शकते. दुर्दैवाने अशी कोणती दुर्दैवी घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय शासनाकडे नाही असा आरोपही अनिल देशमुखांनी केला. 

२०१७ मध्ये कोचिंग क्लासेसवर नेमण्यात आलेल्या समितीवर विधानसभेत चर्चा झाली होती. १२ लोकांच्या समितीने हा मसुदा तयार केला होता. २०१८ ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठवला होता. परंतु ते अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर करु शकले नाहीत. विनोद तावडे यांनी लवकरात लवकर नवीन कायदा तयार करु असे आश्वासन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही असेही अनिल देशमुख म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोचिंग क्लासेसवर कायदा करावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे कोचिंग क्लासेसला मदत करत आहेत असेही अनिल देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण उपस्थित होते. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशिक्षणमंत्रीविनोद तावडेअनिल देशमुखसूरतआग