Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांचा अल्टिमेटम अन् जास्तीच्या जागा सुटल्या; मविआत प्रत्येक पक्ष दोन जागा सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 12:15 IST

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ६ जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. या जागांवर आज महाविकास आघाडीतील नेते चर्चा करणार आहेत.

Prakash Ambedkar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन एक आठवडा  संपला तरीही महाविकास आघाडीचे जागावाटप झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीहीमहाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचे बोलले जात होते, पण काल खासदार संजय राऊत यांनी “प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडली, चर्चाही केली नाही', असं वक्तव्य केले त्यामुळे वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात होते. दरम्यान, आता महाविकास आघाडीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष दोन-दोन जागा सोडायला तयार असल्याचे बोलले जात आहे, वंचितनेही ६ जागांचा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे. 

Uddhav Thackeray : ठाकरे गट महायुतीविरोधात टाकणार 'धोबीपछाड' डाव; १५ उमेदवारांची आज करणार घोषणा

वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ६ जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. या जागांवर आज महाविकास आघाडीतील नेते चर्चा करणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून वंचितसाठी दोन जागा सोडल्या जाऊ शकतात. वंचितसाठी काँग्रेस सकारात्मक असून काँग्रेसला येणाऱ्या दोन जागा सोडण्यासही काँग्रेसचे नेते तयार आहे. यामुळे आता वंचित महाविकास आघाडीसोबत एकत्र येण्याची शक्यता आहे. 

वंचितला दोन जागा सोडण्याबाबत अजूनही राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)  आणि शिवसेना ठाकरे गटाकून कोणत्याही सकारात्मक हालचाली सुरू नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, काँग्रेस वंचितला सोबत घेण्यासाठी आग्रही आहे. वंचितने महाविकास आघाडीला शेवटचा प्रस्ताव दिला असून उद्या प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद आहे.

वंचितसोबतच्या युतीबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणाच आंबेडकर यांनी केली. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत थेट शब्दांत भाष्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि आमचे नाते जुने आहे. एकत्र आहे, याचा आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला झाला. ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातील समाजकारण जास्त करावे, ही भूमिका होती. आता प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तुटल्याची घोषणा केली. हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. युती करताना चर्चा झाली. तर आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती, तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झाले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही.

टॅग्स :महाविकास आघाडीवंचित बहुजन आघाडीभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस