“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 15:04 IST2025-09-27T14:57:03+5:302025-09-27T15:04:28+5:30
Uddhav Thackeray PC News: पीएम कोणाची केअर करतात? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.

“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
Uddhav Thackeray PC News: पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. पीएम केअर फंडातून ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी. पीएम केअर फंड आहे ना, महाराष्ट्रातून मोठा पैसा त्याच्यात आहे. मग, पीएम कोणाची केअर करतात? असा प्रश्न उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. धाराशीव, लातूर येथील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.
मी नुकताच धाराशीव आणि लातूर येथे पूरग्रस्त पाहणी दौरा केला. अतिशय विदारक परिस्थिती आहे. पीक हाताशी आले होते, ते पूर्ण नष्ट झाले, शेतामध्ये चिखल झाला होता. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची वह्या-पुस्तके वाहून गेली आहेत, ती घ्यायची कशी? राज्यात मार्च २०२३ पासून १३ हजार कोटींची जाहीर झालेली रक्कम शेतकऱ्याला अद्यापही मिळालेली नाही. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी ५० हजार हेक्टरी मदत केली. त्यामुळे, जसे डबल इंजिन आणि आणखी एक इंजिन लागले तशी मदत सरकारने करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
भाजपाला प्रशासन चालवता येत नाही
भाजपच्या आमदार-खासदारांनी सगळे पैसे पीएम केअर फंडासाठी दिले होते, त्यामुळे, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री सहायता निधीवर बोलण्याचा अधिकार नाही. भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, आता कोरोनाचे उणे दुणे काढायचे नाही, काढायचे असतील तर मी चर्चा करायला तयार आहे, पण आता गरज आहे शेतकऱ्यांना मदतीची, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्थितीवर मला दया येत आहे. कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये कित्येक ठिकाणी चिता जळत होत्या. पण, महाराष्ट्रात आम्ही जनतेची काळजी घेतली, शिवभोजन थाळाही आम्ही देऊ केली होती. त्यामुळेच, आता सरकारने पीएम केअर फंडातून मदत करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.