"हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नसला तरी बंद मागे"; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 19:33 IST2024-08-23T19:16:31+5:302024-08-23T19:33:53+5:30
महाराष्ट्र बंदला मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नसला तरी बंद मागे"; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
Maharashtra Bandh : बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हणत राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरण आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ मविआकडून राज्यात शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने या बंदला बेकायदेशीर ठरवत परवानगी नाकारली आहे. हायकोर्टाने निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहान केले आहे. काँग्रेसनेही हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे म्हटलं आहे.
"उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध होता. हायकोर्टाने तत्परतेने या बंदला मनाई केली आहे. न्यायालय तत्परतेने हालू शकते याचे मला कौतुक वाटते. मी आता कोर्टाकडून अपेक्षा करतो ज्या तत्परतेने तुम्ही निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्ह्यातील आरोपींबद्दल दाखवून त्यांना शिक्षा दाखवावी. हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. पण कोर्टाचा आदर आम्हाला ठेवावा लागतो. याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जावू शकतो. पण तिथे जाणे आणि निकाल यायला वेळ लागतो. या बंदचे कारण वेगळं होतं. सुप्रीम कोर्टात जाण्याची ही वेळ नाही. तिथे गेल्यावर जनतेच्या मनातील उद्रेक उफाळला तर सगळ्यांना कठीण होईल. शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केलं आहे. आम्ही बंद जरुर मागे घेत आहोत पण राज्यभर मविआचे नेते तोंडाला काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे घेऊन निषेध करणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"बंदला बंद म्हटलं तर आम्ही तोंड बंद करायचे ठरवलं आहे. मोर्चे, संप या गोष्टी शिल्लक आहेत की नाही. याला सुद्धा बंदी केली आहे का? लोकांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत का? मी जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं होतं. बंद दरम्यान दगडफेक करा असं कुठेही म्हटलं नव्हतं. कारण जी गोष्ट घडली आहे त्यामुळे प्रत्येक घरात चिंता निर्माण झालीय. बंद कायद्यानुसार करता येत असेल आम्ही तोंडच बंद करतो. मी स्वतः उद्या ११ वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे. त्यालाही कुणी मनाई केली तर जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.